शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता एनसीपी अध्यक्ष शरद पवार पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला पण आज पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत आपला 'भाकरी परतण्याचा' शब्द खरा केला आहे. अध्यक्ष पदी शरद पवार हे कायम राहणार आहेत पण आता एनसीपी मध्ये कार्यकारी अध्यक्ष (NCP New Working Presidents) हे नव पद तयार करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारीचं विभाजन केलं आहे. यासाठी 9 जणांची निवड करण्यात आली आहे.
एनसीपी मध्ये 9 जणांवर जाबाबदारी
- प्रफुल्ल पटेल – मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा
- सुप्रिया सुळे – महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी
- सुनील तटकरे – ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग
- डॉ. योगानंद शास्त्री- दिल्ली सेलच्या अध्यक्षपद
- के. के. शर्मा – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग
- फैजल – तामिळनाडू, तेलंगणा, केरळ
- नरेंद्र वानवा – सर्व पूर्वेकडची राज्ये, आयटी विभाग
- जितेंद्र आव्हाड – बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग
- नसीम सिद्दिकी – उत्तर प्रदेश, बिहार, गोवा
शरद पवार यांनी आजची कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच दिली आहे. दरम्यान मविआ मध्ये मंत्री राहिलेल्या जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी मिळाली आहे.
"पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार." असं ट्वीट करत सुप्रिया सुळेंनी देखील जबाबदारी स्वीकारली आहे.