पराभवाच्या छायेमुळे भाजप पुन्हा एकदा बालकोटसारखी योजना राबविण्याच्या विचारात: मेहबुबा मुफ्ती
Mehbooba Mufti, PDP | (Photo Credits: ANI)

Lok Sabha Elections 2019: भारतीय जनता पक्षाला (BJP) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आपला पराभव स्वच्छ दिसत आहे. त्यामुळे ते देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करु इच्छित आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या उर्वरीत टप्प्यांमध्ये मते मिळविण्यासाठी भाजप पुन्हा एकदा पाकिस्तानवर (Pakistan) बालकोट (Balakot) प्रमाणे कारवाई करण्याचा विचार करत, असल्याचा घणाघाती आरोप जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबुबा आणि पीडीपी अध्यक्ष ( Peoples Democratic Party) मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी केला आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीर विधानसभेत राजकारणातील अभूतपूर्व वळण पाहायला मिळाले होते. भारतीय जनता पक्ष आणि पीडीपी या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत टोकाचे अंतर आहे. अनेकदा हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कडवे टीकाकार राहिले आहेत. तरीही दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता सोपान चढला होता. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या या राजकारणावर प्रचंड टीका झाली. दरम्यान, भाजपच्या पाठींब्यावर असलेले पीडीपी सरकार कोसळले. त्यानंतर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. अद्यापही या राज्यात राष्ट्रपती राजवटच लागू आहे. लोकसभा निवडणुकीत पीडीपी आणि भाजप एकमेकांविरोधात लढताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यांत पार पडणार आहे. त्यापैकी मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिल 2019 रोजी पार पडला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 20 राज्यांतील 91 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. तर, दुसरा टप्पा 18 एप्रिल रोजी पार पडत आहे. दुसऱ्या टप्यासाठी 14 राज्यांत 97 मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडत आहे. तर, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या टप्प्यासाठी अनुक्रमे, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच, तिसऱ्या टप्प्यासाठी 14 राज्यातील 115 मतदारसंघ, चौथ्या टप्प्यासाठी 9 राज्यातील 71 मतदारसंघ, पाचव्या टप्प्यासाठी 7 राज्यांत 51 मतदारसंघ, सहव्या टप्प्यासाठी 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि आणि सातव्या आणि अखेरटच्या टप्प्यासाठी 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान पार पडणार आहे. (हेही वाचा, 'पुलवामा हल्ला हा पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट' माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांचा आरोप)

दरम्यान, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या सात टप्प्यांतील मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे. मात्र, व्हीव्हीपॅट स्लिप्स मोजणी केल्यास मतमोजणीला विलंबही लागू शकतो असे निवडणुक आयोगाने आगोदरच स्पष्ट केले आहे.