Lok Sabha Election 2019: भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाने छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यात एक महत्त्वाचा निर्णय घेत अनोखा प्रयोग राबवला आहे. या वेळी लोकसभा निवडणूक लढवताना राज्यात कोणत्याच विद्यमान खासदाराला पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. याचाच अर्थ असा की, राज्यभरात (छत्तीसगड) सर्व विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार. या राज्यात लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत. या सर्व जागांवर आता छत्तीसगड भाजप (Chhattisgarh BJP) नवे उमेदवार देणार आहे. छत्तीसगड भाजप प्रदेशाध्यक्ष अनिल जैन (Anil Jain) यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली.
अनिल जैन यांनी सांगितले की, छत्तीसगड राज्यातून सर्वच्या सर्व (10) उमेदवार नवे असतील. पक्षाच्या दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय निवडणूक समिती बैठकीनंतर जैन यांनी ही माहिती दिली. छत्तीसगड राज्यात मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव झाला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने पक्षनेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगड भाजपचे आणखी एका ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्याने सांगितले की, 'निवडणुकीत बदल हा हवा. त्यामुळे आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार केला.' (हेही Lok Sabha Elections 2019: भाजपला मोठा धक्का; 2 मंत्री, 12 आमदार यांच्यासह 15 नेत्यांनी सोडला पक्ष)
एएनआय ट्विट
Chhattisgarh BJP in-charge & National General Secretary Anil Jain: BJP will change all 11 sitting MPs in this election, CEC has approved it. (file pic) pic.twitter.com/aOGDtjZkQV
— ANI (@ANI) March 19, 2019
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड राज्यात काँग्रेसने 68 जागा जिंकल्या होत्या. गेली 15 वर्षे भाजप इथे सत्तेत होती. मात्र, 15 वर्षे सत्तेत राहूनही विधानसभा निवडणूक 2018 मध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत भाजपला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील एकूण मतांची टक्केवारी काढली तर त्यात सुमारे 10 टक्क्यांचे अंतर होते. पक्षाने हा निर्णय पूर्णपणे अंमलात आणला तर, माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचीही संभाव्य उमेदवारी धोक्यात येऊ शकते अशी चर्चा आहे. कारण, रमणसिंह यांचे चिरंजीव अभिषेख सिंह हे विद्यमान खासदार आहेत.