pm modi and Navjot Singh Sidhu | (Photo Credits- File photo for representation only)

India Pakistan Tension: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी एक नवे ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये सिद्धू यांनी चाणक्याच्या(Chanakya) एक वाक्याचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धू हे अनेकदा आपली विधाने, दौरे आणि समाज माध्यमांमधून व्यक्त केलेले विचार आदींमुळे चर्चेत असतात. 'ज्या युद्धात राजाच्या जीवाला धोका नसतो त्याला राजकारण म्हणतात, असे सिद्धू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सिद्धू यांनी चाणक्याच्या वाक्यानंतर आपल्या ट्विटमध्ये इंग्रजीमध्ये पुढे लिहिले आहे की, युद्ध एक विफल सरकारचे आश्रयस्थान आहे. तुम्ही तुमच्या राजकीय उद्दीष्टांसाठी किती निष्पाप सैनिकांचा बळी देणार आहात. आपल्या वक्तव्यांमुळे सिद्धू नेहमीच चर्चेत राहतात. पुलवामा हल्लानंतर सिद्धू यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. या टीकेनंतर सिद्धू यांनी कपील शर्मा याच्या शोमधूनही बाहेर पडावे लागले. (हेही वाचा,'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंह सिद्धू यांची उचलबांगडी; दहशतवादी हल्ल्यावर वक्यव्य देणे पडले महागात )

सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४2 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारतामध्ये तीव्र संतापाची लाट कायम आहे.

सरकारने लोकभावना विचारात घेऊन आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या विचाराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचे सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या भारताच्या या कारवाईनंतर हडबडून गेलेल्या पाकिस्तानच्या काही विमानांनी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देताच या विमानांनी पळ काढला.