कपिल शर्मा आणि नवजोत सिंह सिद्धू (Photo Credits: Facebook)

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त लष्कराचे जवान शहीद झाले. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानबद्दल असलेला रोष अजून उफाळून आला आहे. पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे अशी मागणे देशभरातून करण्यात येत आहे. बॉलीवूड कलाकारांपासून ते राजकारणी लोकांपर्यंत प्रत्येकाने याबाबत आपले मत व्यक्त केले, यात माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या वक्त्यव्यानंतर देशात संताप व्यक्त केला जाते आहे. त्यांच्या विधानामुळे लोकांकडून 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मधून सिद्धू यांना काढून टाकण्याची मागणी केली जात होती. आता सिध्‍दू यांना कपिलच्‍या शोमधून हटवण्‍यात आल्‍याचे वृत्त आहे. (हेही वाचा : Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा; पाकिस्तानी माध्यमांनी व्यक्त केला अभिमान)

‘काही लोकांच्या कृत्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार कसे ठरवले जाऊ शकते? आपण कुणा व्‍यक्‍तीला जबाबदार ठरवू शकतो का? हा भ्‍याड हल्‍ला होता, मी याचा निषेध करतो. ही घटना निंदनीय आहे आणि ज्‍यांनी हे केले आहे, त्‍यांना शिक्षा मिळायलाच हवी.’ असे वक्त्यव्य सिद्धू यांनी केले होते. यावर चिडलेल्या भारतीय जनतेने ट्विटरवर बायकॉट कपिल शर्मा आणि #boycottsidhu चा ट्रेंडदेखील सुरू केला. नवजोत सिंह सिद्धू यांना शोमधून बाहेर काढण्याची मागणी इतकी तीव्र झाली होती की, असे न झाल्यास कपिलचा शो बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. आता आता चॅनलने सिद्धू यांना कपिल शर्माच्‍या शोमधून काढून टाकले आहे, त्‍यांच्‍या जागी अर्चना पूरण सिंह शोमध्‍ये दिसणार आहे.