इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची नेमकी भेट कशी झाली होती? वाचा त्या मागचं सत्य
Karim Lala, Indira Gandhi (Photo Credits: Wikipedia/Getty)

Indira Gandhi And Karim Lala Meet: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी, दैनिक लोकमत या वृत्तसंस्थेने आयोजित केलेल्या एक कार्यक्रमात एक वादग्रस्त विधान केलं. संजय राऊत यांनी करीम लाला आणि इंदिरा गांधींच्या भेटीबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी निषेध व्यक्त केल्याने शिवसेनेची राज्यात काँग्रेससोबत असलेली युती तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, अखेरीस काळ संजय राऊत यांनी आपलं इंदिरा गांधी यांच्याविषयीचं ते वक्तव्य मागे घेतलं. तसेच त्यांनी ट्विट करत असे लिहिले की, "करीम लाला हा पठाण समाजाचं नेतृत्व करायचा, 'पख्तुन-ए-हिंद' ही त्याची संघटना होती. पठाण समाजाचा नेता या नात्यानं इंदिरा गांधी त्याला भेटायच्या. पण ज्यांना मुंबईचा इतिहास माहीत नाही, त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला."

परंतु, करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट नक्की कशी झाली हे आपण आज जाणून घेणार आहोत.

सध्या सोशल मेडियावर करीम लाला आणि इंदिरा गांधी यांचा सोबत असणारा एक फोटो व्हायरल होत आहे. परंतु, हा फोटो नेमका कधी आणि कसा काढण्यात आला होता याबद्दल क्राइम रिपोर्टर बलजीत परमार यांनी ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधला आहे.

बलजीत परमार हे या भेटीविषयी सांगताना म्हणाले, "1983 साली मी जेव्हा करीम लालाची मुलाखत घेतली होती, तेव्हा पहिला प्रश्न त्यांना हाच विचारला होता, की तू इंदिरा गांधी यांना ओळखता का? कारण तेव्हा मला त्याचा इंदिरा गांधींसोबतचा फोटो मिळाला होता. त्यावर करीम लाला म्हणाला की तो या मॅडमसोबत दोन वेळा बोलल आणि एकदाच भेटल आहे."

'करीम लाला' या नावाच्या उच्चाराने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा हा व्यक्ती नेमका आहे कोण? जाणून घ्या त्याची गुन्हेगारी जगतातील पार्श्वभूमी

परमार इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या फोटोविषयी बोलताना म्हणाले, "हा घटना 1973 सालची आहे. डॉ. हरिंद्रनाथ चटोपाध्याय हे प्रसिद्ध स्क्रीप्ट लेखक आणि गीतकार होते. त्यांना त्या साली पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता. मुळात, ज्यांना पुरस्कार मिळतो, ती व्यक्ती आपल्या सोबत दोन व्यक्तींना घेऊन जाऊ शकते. म्हणूनच चटोपाध्याय हे त्यांच्यासोबत  करीम लाला याला दिल्ली फिरवून आणतो म्हणत घेऊन गेले. राष्ट्रपती भवन पाहायला मिळेल या निमित्ताने करीम लाला त्यांच्यासोबत गेला. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते दरबार हॉलमधून बाहेर पडत असताना दुसऱ्या एका कक्षातून काही लोकांसोबत अचानक इंदिरा गांधी बाहेर आल्या. चटोपाध्यायांसोबत इंदिरा गांधीचे कौटुंबिक संबंध होते आणि म्हणूनच त्यांनी करीम लालाची ओळख 'पख्तुन-ए-हिंद' चे अध्यक्ष अशी इंदिरा गांधी यांना करून दिली. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. करीम लालांनी इंदिरा गांधींना म्हटलं, की तुम्ही मुंबईत आलात तर तुमची सेवा करण्याची संधी द्या . इंदिरा गांधींनीही त्यांना म्हटलं, की तुम्ही दिल्लीत कधी आलात तर भेटा."

ते पुढे म्हणाले, "त्याचवेळी राष्ट्रपती भवनच्या फोटोग्राफरने त्यांचा फोटो काढला. राष्ट्रपती भवनच्या फोटोग्राफरना सूचना असते, की ज्यांचा फोटो काढला आहे, त्यांना तो द्यावा लागतो."