महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणूकीनंतर सत्ता स्थापनेचा तिढा कायम राहिल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. तसेच मुख्यमंत्री पदावरुन भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) पक्षात वाद झाल्याने या दोन्ही पक्षाची युती तुटली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे संबंध संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. परंतु दिल्लीत रविवारी एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली असून त्याला शिवसेना अनुपस्थिती लावणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत आता पुन्हा एका राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या सोमवार पासून सुरुवात होत आहे. त्यासंदर्भातील मुद्द्यांवरच चर्चा करण्यासाठी रविवारी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडणार आहे. परंतु महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन निर्माण झालेल्या वादामुळे भाजप- शिवसेना युतीत फुट पडली आहे. त्यामुळेच शिवसेना या बैठका गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु शिवसेनेला या बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले नसल्याचे ही सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेबाबत बोलायचे झाल्यास राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असे वारंवार म्हटले जात आहे. तर शिवसेना पक्ष राष्ट्रवादी महाआघाडी सोबत सत्ता स्थापन करणार असल्याची ही चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप यावर अधिकृत रित्या कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री असणार असा दावा केला आहे.
तर महाराष्ट्रात पुढची 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहावा अशी आमची इच्छा आहे. मात्र, असे असले तरी, आम्ही पुन्हा येईन.. आम्ही पुन्हा येईन, असे म्हणत बसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊतयांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टोला लगावला. त्यावेळी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.