पुढचे 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहावा ही इच्छा, पण आम्ही 'पुन्हा येईन..पुन्हा येईन' म्हणणार नाही: संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात पुढची 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहावा अशी आमची इच्छा आहे. मात्र, असे असले तरी, आम्ही पुन्हा येईन.. आम्ही पुन्हा येईन, असे म्हणत बसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांचे नाव न घेता टोला लगावला. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-NCP-Congress) या पक्षांच्या नव्या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत प्रसारमाध्यमांसह जनतेला उत्सुकता आहे. या उत्सुकतेतून प्रसारमाध्यमांनी राऊत यांना विचारले असता, राज्याच्या हितासाठी एकसूत्री कार्यक्रम हाती घेऊनच हे तिन्ही पक्ष 'किमान समान कार्यक्रम' राबवतील असेही राऊत या वेळी म्हणाले.

देशात किंवा राज्यात कोणतेही आघाडी सरकार अस्तित्वात येत असताना किमान समान कार्यक्रम हा आखावाच लागतो. तरच ते सरकार बनू शकते. अशा आघाडी सरकारमध्ये राज्याच्या आणि देशाच्या हितासाठीच कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे सर्व पक्ष एकत्र येऊन कार्यक्रम बनवत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही राज्यातील महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यांना सरकार चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सरकार चालवताना त्यांचाही चांगला फायदा राज्याला होईल, असेही राऊत या वेळी म्हणाले. (हेही वाचा, तीनही पक्षांच्या बैठकीमध्ये ठरवलेला 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' पक्षश्रेठींना पाठवला; लवकरच महाशिवआघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता)

एएनआय ट्विट

महाराष्ट्राला शिवसेनाच नेतृत्व देईल. कोणी कितीही प्रयत्न करु देत. अनेकांनी लाख प्रयत्न केले तरी, शिवसेना पुढे जाणार आणि महाराष्ट्राला नेतृत्व देणारच असे सांगात संजय राऊत पुढे म्हणाले सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर प्रसारमाध्यमं आणि इतरांनी चिंता करु नये. महाराष्ट्राच्या हितासाठीच एकसूत्री कार्यक्रम ठरविण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच सत्तावाटपाचा फॉर्म्युला असेन. राज्यात सत्तेवर येणारे सरकार हे शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सत्तेवर येईल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.