विधानसभेत सर्वात जास्त आमदार निवडून आणणारे तीनही मोठे पक्ष सत्ता स्थापन करण्यास अयशस्वी ठरल्याने, आता महाराष्ट्रात राष्ट्रापती राजवट लागू झाली आहे. भाजप (BJP) सोबत सत्ता स्थापनेची बोलणी फिसकटल्यावर, अखेर शिवसेनेला (Shivsena) सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसची (Congress) मदत घ्यावीच लागली. सध्या या तीनही पक्षांमध्ये सत्तास्थापनेबद्दल चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तीनही पक्षांमध्ये महत्वाची बैठक आज पडली, त्यानुसार ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ ठरवला गेला आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील महाशिवआघाडीच्या (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. त्यांनतर तीनही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये समान कार्यक्रम ठरवल्याची माहिती देण्यात आली. असा हा एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा तीनही पक्ष श्रेठींकडे पाठवला गेला आहे. तीनही पक्षांचे प्रमुख त्यावर विचार करतील, त्यानंतरच सत्ता स्थापनेबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. वेळ प्रसंगी तीनही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून चर्चा करतील अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. (हेही वाचा: 'महाशिवआघाडी' नैतिकतेला धरून नाही; शिवसेनेने स्वार्थासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा हात धरला, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल)
आजच्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध प्रश्न, शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय – धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय झाला. दरम्यान रविवार, 17 नोव्हेंबर रोजी शरद पवार दिल्लीला सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्याचवेळी महाशिवआघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.