Sharad Pawar, Sonia Gandhi And Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

विधानसभेत सर्वात जास्त आमदार निवडून आणणारे तीनही मोठे पक्ष सत्ता स्थापन करण्यास अयशस्वी ठरल्याने, आता महाराष्ट्रात राष्ट्रापती राजवट लागू झाली आहे. निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेना (BJP-Shiv Sena) यांच्या महायुतीची हवा होती, मात्र त्यानंतर सत्ता स्थापन करताना शिवसेनेने 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणी केली ज्याला भाजपने नकार दिला. अखेर शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची मदत घ्यावीच लागली. सध्या या तीनही पक्षांमध्ये सत्तास्थापनेबद्दल चर्चा सुरु आहे. अशात अवघ्या काही तासांमध्ये नव्याने उदयास आलेल्या या महाशिवआघाडी (Mahashivaghadi) विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महाशिवआघाडी ही नैतिकतेला धरून नाही असे म्हणत, हिंदू महासभेचे प्रमोद जोशी (Pramod Joshi) यांनी याचिका दाखल केली आहे. केवळ लालसेपोटी शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जात आहे, ते योग्य नाही. याच गोष्टीविरोधात जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. शिवसेना आणि भाजप यांची विधानसभा निवडणुकांमध्ये युती होती. दोन्ही पक्ष ‘हिंदुत्व’ या मुद्द्यावर निवडणुक लढले, मतदारांनीही त्यांना चांगलाच कौल दिला. आता सत्ता स्थापन करतेवेळी निर्माण झालेल्या वादामुळे फक्त सत्ता मिळावी म्हणून, शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात पकडत आहे ते योग्य नाही असे प्रमोद जोशी यांनी सांगितले. (हेही वाचा: शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट)

याच मुद्द्यावर जोशी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. बिहारचे उदाहरण देत जोशी म्हणाले, भाजपने केलेली युती निवडणूकपूर्व नव्हती. बिहारमध्ये भाजपाने संयुक्त जनता दलासोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. मात्र जनतेने भाजपाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. दरम्यान सध्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित सरकार स्थापन करण्यासाठी सकारात्मक असून सामायिक कार्यक्रम ठरवला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार रविवारी दिल्लीला सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.