Sharad Pawar, Sonia Gandhi And Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाली असून राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने (BJP) सत्ता स्थापनेबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेना (ShivSena), काँग्रेस- राष्ट्रवादी (Congress-NCP) पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंबधी चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची चर्चा पार पडल्यानंतर आता दिल्लीत बैठक होणार आहे.

मुंबईत मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत शिवसेनाला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा झाली होती. या बैठकीला काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली यासंबंधी अहमद पटेल सोनिया गांधी यांना रिपोर्ट देणार आहेत. दरम्यान 17 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिय गांधी यांच्यात दिल्लीत बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. हे देखील वाचा-महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुंबई मध्ये शेतकर्‍यांचा एल्गार; आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले परंतु, राज्यात सत्तास्थापनेची तिढा कायम आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील? की शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला हात देऊन महाशिवआघाडी स्थापन करेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.