Amrit Bharat Station: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 ऑगस्टला रेल्वे सुविधांची मोठी भेट देणार आहेत. ते 'अमृत भारत योजने' अंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी करतील. अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 508 स्थानकांचा विकास करण्यात येणार असून याचे भूमिपूजन उद्या रविवारी दि .6 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील 44 स्थानकांचा यात समावेश आहे. यात मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील एकूण 123 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तसेच प्रवाशांच्या सुविधाही वाढवण्यात येणार आहेत. नवीन स्टेशन इमारतीत तळमजल्यावर प्लॅटफॉर्म आणि प्रवासी बसण्याची सुविधा असेल. पहिल्या मजल्यावर, विश्रामगृहासह ट्रेनच्या कामकाजासाठी कार्यालय तयार केले जाईल.
निवडक स्थानकांवर उपलब्ध असलेली सुविधा
एकत्रित वेटिंग रूम, टॉयलेट, कॅफेटेरिया, खानपानासाठी किरकोळ स्टॉल. प्रवासी आणि व्यावसायिकांना बसण्यासाठी लाउंज.
स्टेशन समोरील भागाचा विकास आणि सुशोभीकरण. लिफ्ट आणि एस्केलेटर. पाणी निचरा व्यवस्था. वाय-फाय सुविधा. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी या स्थानकांवर 12 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज बनवण्यात येणार आहे. ज्यावर पादचाऱ्यांसाठी मार्ग असेल, तसेच प्रवाशांना गाडीची वाट पाहत बसण्याचीही सोय असेल. या स्थानकांचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. दिव्यांग आणि वृद्धांसाठीही सुविधा असतील.
मुंबई विभागातील निवडलेले स्थानक
स्थानक सुधारणा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने, दीर्घकालीन उपक्रम म्हणून राबविण्यात येणार आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग - भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड या स्थानकांचा विकास केला जाणार आहे.