Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Petrol Diesel Price Hike: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमुळे जनता महागाईने होरपळली आहे. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीत 80 पैशांच्या वाढीनंतर, एक लिटर पेट्रोलची किंमत 97.81 रुपयांवर पोहोचली आहे, तर डिझेल 89.07 रुपयांना विकले जात आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नव्हती. यानंतर गेल्या मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होऊ लागली. दोन दिवस भाव वाढवल्यानंतर तेल कंपन्यांनी तिसर्‍या दिवशीही दरात वाढ केली नाही. आता चौथ्या दिवशी तिसऱ्यांदा तेलाच्या दरात पुन्हा 80 पैशांनी वाढ झाली आहे. (हेही वाचा -गेल्या 5 महिन्यांपासून इंधनाच्या किमती न वाढवल्यामुळे IOC, BPCL, HPCL ला 19,000 कोटींचे नुकसान; मूडीजने जारी केला अहवाल)

आयओसीएलच्या म्हणण्यानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 112.51 रुपये आणि डिझेलची किंमत 96.70 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 107.18 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.22 रुपयांना विकले जात आहे. त्याच वेळी, चौथ्या महानगर चेन्नईमध्ये आज पेट्रोल 103.67 रुपये आणि डिझेल 93.71 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

इंडियन ऑईलने रशियाकडून विकत घेतले कच्चे तेल -

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान भारत रशियाकडून सवलतीच्या दराने तेल खरेदी करत आहे. इंडियन ऑइलने बुधवारी कच्च्या तेलाच्या मोठ्या मालाची खरेदी पूर्ण केली आहे. यासोबतच कंपनीने पश्चिम आफ्रिकन तेलही मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने मे महिन्यासाठी रशियाकडून 3 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. तर पश्चिम आफ्रिकेकडून 20 लाख बॅरल तेल खरेदी करण्यात आले आहे. कंपनीने रशियाचे हे कच्चे तेल 'विटोल' नावाच्या व्यापाऱ्याकडून मोठ्या सवलतीत विकत घेतले आहे.

एसएमएसद्वारे तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत -

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. मात्र, नोव्हेंबरपासून भारतातील किमती स्थिर आहेत.