अखेर भारतीय किनारपट्टीवर थैमान माजवून फनी वादळ (Cyclone Fani) बांग्लादेशकडे सरकले आहे. तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल अशा तीन राज्यांच्या किनारपट्टीवरून या वादळाने आपला मार्ग काढला होता. ओडिशामध्ये प्रतितास 200 किलोमीटर वेगाने हे वारे धावले, यामध्ये राज्यात बरेच नुकसान झाले आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या शनिवारी वाढून 16 वर पोहोचली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना या वादळाचा फटका बसला आहे. ओडिशामध्ये हाहाकार माजवून हे वादळ पश्चिम बंगालमध्ये पोहचले, जिथे या वादळाचा वेग कमी होऊन 90 किमी प्रतितास इतका झाला होला.
हवामानखात्याने या वादळाचा अंदाज वर्तवल्यावर तातडीने प्रशासनाने हालचाल करीत 45 हजार कर्मचाऱयांच्या मदतीने अवघ्या 24 तासांत, तब्बल 12 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. या गोष्टीमुळे संयुक्त राष्ट्रांनीही भारताची पाट थोपटली आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना या वादळाचा फटका बसला आहे. शुक्रवारी पुरीमध्ये जोरदार पाऊस झाला, यामुळे अनेक झोपड्या, कच्ची घरे वाहून गेले, पिकांचे नुकसान झाले. सध्या 10 हजार गावांत आणि शहरी भागात युद्धस्तरावर मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. (हेही वाचा: Cyclone Fani: वादळामुळे गोंधळून जाऊ नका, सुदर्शन पट्टनाईक यांनी वाळूशिल्पातून दिला संदेश)
पेट्रोल, डिझेल, एलपीजी, केरोसीन आणि विमान इंधनाची कमतरता भासू नये म्हणून, इंडिअन ऑइल कंपनी मदतीला धावली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ओडिशाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. केंद्र सरकारकडून ओडिशाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले गेले आहे. यापूर्वी 1999 सालीही ओडिशामध्ये असेच भयानक चक्रीवादळ आले होते, त्यावेळी तब्बल दहा हजार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी राज्य सरकारचे नियोजन आणि प्रशासनाने उचललेली पावले यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची NEET ही परीक्षा ओडिशामध्ये पुढे ढकलण्यात आली आहे. बाकी राज्यांमध्ये ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होईल.