देशात भाजपच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातली शांतता भंग पावत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपात भाजपला पर्याय मिळेल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही शरद पवार या वेळी म्हणाले. काँग्रेस नेते योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी ते बोलत होते. योगानंद शास्त्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सुरु होत्या. मात्र, त्याला पुष्टी मिळत नव्हती. आज त्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत थेट पक्षप्रवेश झाला.
योगानंद शास्त्री हे काँग्रेस पक्षाचे जुने आणि ज्येष्ठ नेते होते. काँग्रेस सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्रिमंडळात काम केले आहे. तसेच, दोन टर्म ते विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत. या पक्षप्रवेशावेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपला पर्याय देण्यासाठी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रवादीचे सहकारी पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, राजधानी दिल्लीमध्ये पक्षाची जी स्थिती असायला पाहिजे होती तशी नव्हती. दिल्ली शहरात काँग्रेस पक्षाचे संघटन नाही. त्यामुळे आम्हाला इथे अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi on PM Narendra Modi: मिस्टर 56 इंच घाबरले आहेत, देशाच्या सुरक्षेशीही छेडछाड; राहुल गांधी यांचा पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा)
ट्विट
Delhi: Former Speaker of Delhi Assembly, Yoganand Shastri joins NCP in the presence of party chief Sharad Pawar.
Shastri had resigned from Congress in 2020. pic.twitter.com/tuPaCy2OQk
— ANI (@ANI) November 17, 2021
योगानंद शास्त्री यांच्या पक्षप्रवेशाने आपणास अत्यंत आनंद होत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होण्यास मदत होईल. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष पद प्रदीर्घ काळ चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. एक चांगला अध्यक्ष विधानसभेचं काम कसं चालवू शकतो याचा आदर्श शास्त्रीजींनी देशासमोर घातला आहे. पाठीमागील प्रदीर्घ काळ आमची त्यांच्याशी चर्चा सुरु होती. आता त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेस केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं स्वागत करतो.