World Happiness Report 2020: फिनलँड ठरला जगातील सर्वात आनंदी देश; भारताला शेवटच्या 10 मध्ये स्थान; जाणून घ्या यादी
Finland People| प्रातिनिधिक प्रतिमा| संग्रहित संपादित प्रतिमा

संपूर्ण जग कोरोना विषाणू (Coronavirus) सारख्या साथीच्या आजाराशी झगडत आहे. जगभरातील लोक यामुळे त्रस्त आहेत. अशात संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) शुक्रवारी World Happiness Report 2020 जाहीर केला. या अहवालानुसार फिनलँड (Finland) सलग तिसर्‍या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. या यादीमध्ये डेन्मार्क (Denmark) ने दुसरे, तर स्वित्झर्लंडने (Switzerland) तिसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या दहा आनंदी देशांपैकी नऊ देश युरोपमधील आहेत, तर आशियातील कोणताच देश पहिल्या 20 मध्ये नाही. अफगाणिस्तान, दक्षिण सुदान, झिम्बाब्वे आणि रवांडा या देशांना या यादीमध्ये सर्वात शेवटचे स्थान प्राप्त झाले आहे.

देश आनंदी आहे का नाही हे ठरवण्यासाठी, 6 मानकांवर प्रश्न तयार केले जातात. त्यामध्ये, संबंधित देशातील प्रति व्यक्तीची जीडीपी, सामाजिक सहयोग, औदार्य आणि भ्रष्टाचार, सामाजिक स्वातंत्र्य व निरोगी जीवन यांचा समावेश आहे. याबाबत मिळालेल्या उत्तरांच्या आधारावर जगातील सर्वात सुखी देशांची यादी तयार केली जाते, ज्यासाठी भूतानने 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेला प्रस्ताव दिला होता. 20 मार्च रोजी जागतिक आनंद दिनानिमित्त युनायटेड नेशन्स हप्पीनेस इंडेक्सचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

जगातील सर्वात आनंदी 20 देश –

फिनलँड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे, नेदरलँड्स, स्वीडन, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, लक्समबर्ग, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, इस्राईल, कोस्टा रिका, आयर्लंड, जर्मनी, युनायटेड स्टेट्स, झेक प्रजासत्ताक, बेल्जियम

जगातील सर्वात नाखूष देश –

अफगाणिस्तान, दक्षिण सुदान, झिम्बाब्वे, रवांडा, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, टांझानिया, बोत्सवाना, येमेन, मलावी, भारत

जगातील सर्वात आनंदी शहरे –

हेलसिंकी (फिनलँड), आरहस (डेन्मार्क), वेलिंग्टन (न्यूझीलंड), ज्यूरिच (स्वित्झर्लंड), कोपेनहेगन (डेन्मार्क), बर्गन (नॉर्वे), ओस्लो (नॉर्वे), तेल अवीव (इस्राईल), स्टॉकहोम (स्वीडन), ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया)

जगातील सर्वात नाखूष शहरे –

काबूल (अफगाणिस्तान), साना (येमेन), गाझा (पॅलेस्टाईन), पोर्ट-ए-प्रिन्स (हैती), जुबा (दक्षिण सुदान), दार एस सलाम (टांझानिया), दिल्ली (भारत), मासेरू (लेसोथो), बांगुई (मध्य आफ्रिकन रिपब्लिक), कैरो (इजिप्त)

दरम्यान, या यादीमध्ये भारताची कामगिरी अत्यंत खराब आहे. गेल्या वर्षी भारताचे स्थान 140 होते, ते आता घसरून 144 झाले आहे. महत्वाचे म्हणजे शेजारील देश पाकिस्तान 66 व्या, चीन 94 व्या, बांगलादेश 107 व्या, नेपाळ 92 व्या तर मालदीव 87 व्या स्थानावर आहे. अशाप्रकारे भारताला शेवटच्या दहा मध्ये स्थान मिळाले आहे.