राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा; NHAI पुढील 5 वर्षांत उभारत आहे 600 Wayside Amenities
National highway (Photo Credits: Wikipedia)

देशात पसरलेल्या 1.25 लाख किलोमीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्ग (National Highways) नेटवर्कवर लोक आता जागतिक दर्जाचा अनुभव घेऊ शकणार आहेत. ट्रक चालक आणि सामान्य प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक आधुनिक सुविधा मिळतील, अशी घोषणा एनएचएआयने (NHAI) केली आहे. येत्या पाच वर्षांत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला 600 आधुनिक सुविधा केंद्रे उघडण्यात येतील असा दावा कंपनीने केला आहे. एनएचएआयची योजना आहे की येत्या पाच वर्षांत देशातील 22 राज्यांत 600 हून अधिक ठिकाणी सार्वजनिक सुविधा केंद्रे सुरू केली जातील. या 600 पैकी 130 सुविधा केंद्रे पुढील आर्थिक वर्षात तयार होतील.

रस्त्याच्या कडेला उभा केल्या जाणाऱ्या 120  केंद्रांचा विकास करण्यासाठी एनएचएआयने निविदा मागविल्या आहेत. योजनेनुसार सध्याच्या व भविष्यातील महामार्ग व द्रुतगती महामार्गाच्या 30 ते 50 कि.मी. अंतरावर ही सुविधा केंद्रे बांधली जातील. अशा प्रकारे यथे अनेक जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा पुरविल्या जातील. या सुविधांमध्ये इंधन स्टेशन, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, फूड कोर्ट, किरकोळ दुकाने, बँक एटीएम, शॉवरची सुविधा असलेले प्रसाधनगृहे, मुलांची खेळाची जागा, वैद्यकीय दवाखाना, ग्रामीण हाट आणि स्थानिक हस्तकला उत्पादनांची विक्री यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्गावर दिवसाला अनेक तास आणि बरेच दिवस ट्रक चालवणाऱ्या चालकांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. हे लक्षात घेता स्वतंत्र ट्रक ब्लॉक्सदेखील तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या ठिकाणी ट्रक आणि ट्रेलर पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. या भागात ऑटो वर्कशॉप, ट्रक चालकांच्या राहण्यासाठी वसतिगृह, स्वयंपाक आणि वॉशिंग एरिया, प्रसाधनगृह, स्नानगृहे, वैद्यकीय दवाखाने, ढाबे आणि किरकोळ दुकाने अशा सुविधा असेल. (हेही वाचा: Bank of Maharashtra Recruitment 2021: बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदांसाठी भरती जाहीर; 6 एप्रिल पूर्वी bankofmaharashtra.in वर करा ऑनलाईन अर्ज)

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन मिळेल. यामुळे केवळ वायू प्रदूषण नियंत्रित करण्यास मदत होणार नाही, तर वाहतुकीचा खर्चही खूप कमी होतील.