Work From Home: कंपनीने संपवले वर्क फ्रॉम होम; कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावल्यानंतर 800 लोकांनी दिला राजीनामा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) साथ आल्यानंतर नाईलाजाने कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले. सुरुवातीला असे बरेच कर्मचारी होते ज्यांना घरून काम करणे कठीण जात होते. परंतु हळू हळू याची सवय होत गेली आणि आता बहुतांश कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याला पसंती दिली आहे. सध्या घरून काम करणे हे कर्मचाऱ्यांच्या इतके अंगवळणी पडले आहे की, आता परिस्थिती अशी आहे की, कंपन्यांनी कामावर येण्यास दबाव टाकला तर कर्मचारी नोकऱ्या सोडण्यास तयार आहेत.

व्हाईटहॅट ज्युनियर (WhiteHat Jr) या ऑनलाइन एज्युकेशन कंपनीच्या बाबतीतही असेच घडले आहे. गेल्या दोन महिन्यांत या एडटेक कंपनीतील 800 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कंपनीने या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' संपवून कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले होते, तेव्हापासून कर्मचारी राजीनामे देत आहेत. मनीकंट्रोलने एका अहवालाचा हवाला दिला आहे की, व्हाईटहॅट जूनियरने 18 मार्च रोजी 'घरातून काम' धोरण समाप्त करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना महिनाभरात म्हणजे 18 एप्रिलपर्यंत कार्यालयात येऊन कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे सुमारे 800 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला, कारण ते कार्यालयात यायला तयार नव्हते. राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सेल्स, कोडिंग आणि मॅथ टीममधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या काही महिन्यांत आणखी कर्मचारी राजीनामा देऊ शकतात. (हेही वाचा: 922 नॉन एक्झिक्युटीव्ह पदांसाठी नोकरभरती जाहीर; ongcindia.com वर 28 मेपूर्वी करा अर्ज)

राजीनामा दिलेल्या एका कर्मचाऱ्याने Inc42 ला सांगितले की, एक महिन्याचा वेळ पुरेसा नाही. कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक समस्या असतात. काहींना मुले आणि त्यांच्या शाळांबाबत समस्या आहेत, तर काहींच्या घरी आजारी पालक आहेत. याशिवाय इतरही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. इतक्या कमी वेळेत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगणे योग्य नाही.

दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, खर्चात कपात करण्यासाठी ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे. कंपनी तोट्यात चालली आहे. बाजारात तुमचे नाव खराब न करता खर्च कमी करण्याचा हा एक मार्ग आहे. अन्य एका कर्मचाऱ्याने सांगितले की, कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे हे पाऊल आहे.

अजून एका कर्मचाऱ्याने सांगितले की, राजीनाम्याचे कारण पगार आहे. भरतीच्या वेळी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की व्हाईटहॅट ज्युनियरचे गुरुग्राम, मुंबई आणि बंगळुरू येथे कार्यालये आहेत. त्यांना या ठिकाणी काम करावे लागेल. सुमारे दोन वर्षे घरून काम केल्यानंतर, त्यांचा पगार वाढला पाहिजे जेणेकरून त्यांना या महागड्या शहरांमध्ये राहणे परवडेलनसल्या.