Photo Credit- X

PAK vs UAE, Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मधील १० वा सामना पाकिस्तान आणि यूएई यांच्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवून सुपर-4 मध्ये आपले स्थान पक्के केले, तर यूएई संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, या सामन्यादरम्यान मैदानात एक अपघात झाला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाकिस्तानच्या डावातील सहावे षटक गोलंदाज सॅम अयूब टाकत असताना, यूएईच्या फलंदाजाने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाने अडवला. यावेळी पाकिस्तानी संघाचा यष्टिरक्षक मोहम्मद हारिस याने चेंडू गोलंदाजाकडे फेकला. पण अंपायरचे लक्ष नसल्याने तो चेंडू थेट त्यांच्या डोक्याला लागला. या घटनेनंतर सर्व खेळाडू अंपायरजवळ धावले आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

मैदानातून उपचारांसाठी बाहेर

चेंडू लागल्यामुळे अंपायरला जास्त वेदना होत असल्याने मैदानावरील फिजिओ त्यांच्या मदतीला आले. तपासणी केल्यानंतर, अंपायरना अधिक वेदना होत असल्याने त्यांना मैदानातून बाहेर जावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

AsiaCup 2025: बहिष्काराची भाषा करणारे गुडघ्यावर आले, आर्थिक नुकसानीच्या भीतीने PCB नरमले; वाचा संपूर्ण प्रकरण

पाकिस्तानचा विजय आणि पुढील प्रवास

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १४६ धावा केल्या, ज्यात फखर जमानने सर्वाधिक ५० धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, यूएईचा संघ १७.४ षटकांत १०५ धावांवरच गारद झाला. पाकिस्तानने हा सामना ४१ धावांनी जिंकला. या विजयानंतर आता सुपर-4 मध्ये पाकिस्तानचा सामना २१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा टीम इंडियासोबत होणार आहे. आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाने याआधीही पाकिस्तानला हरवले आहे.