
Asia Cup 2025: 'नो हँडशेक' वादामुळे आशिया कपमध्ये गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला अखेर माघार घ्यावी लागली. यूएई विरुद्धच्या सामन्यापूर्वी बहिष्काराची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने नंतर माघार घेत अखेर सामना खेळण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण नाट्याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) 'धमकीचा बॉम्ब' पूर्णपणे निष्प्रभ ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना पदावरून हटवण्याची मागणी फेटाळल्यावर, पाकिस्तानने सामना खेळण्यास नकार दिला होता, पण अवघ्या एका तासाच्या आत त्यांना मैदानात उतरावे लागले.
कोट्यवधींच्या नुकसानीमुळे PCB गुडघ्यावर आले
एका रिपोर्टनुसार, आयसीसीने पाकिस्तानला इशारा दिला होता की, जर त्यांनी आशिया कप २०२५ वर बहिष्कार टाकला, तर त्यांच्यावर १.६ कोटी अमेरिकन डॉलर्स (जवळपास १४१ कोटी रुपये) चा मोठा दंड लावला जाईल. या दंडाच्या भीतीने पाकिस्तानची हालत खराब झाली आणि अखेर ते सामना खेळण्यास तयार झाले. यामुळे त्यांची सातत्याने 'मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टला हटवा, अन्यथा आम्ही खेळणार नाही' ही भूमिका फुस्स ठरली.
Andy Pycroft to PCB - "Play today or pay $16M and that's the final decision".
- Pakistan 🇵🇰 surrendered after hearing $16M 😆
- What's your take on this 🤔 #PAKvsUAEpic.twitter.com/wfZrOjqjue
— Richard Kettleborough (@RichKettle07) September 17, 2025
अँडी पायक्रॉफ्टवर काय होता आरोप?
१४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट होते. याच सामन्यात 'नो हँडशेक' वादाला तोंड फुटले होते, ज्यावर मोठा गदारोळ झाला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक आणि सामन्यानंतरही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, ही गोष्ट पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या बोर्डाला चांगलीच खटकली.
सामन्यानंतर पीसीबीने अँडी पायक्रॉफ्टला हटवण्याची मागणी करत त्यांच्यावर भारतीय संघाला पाठिंबा देण्याचा आरोप लावला. तसेच, त्यांनी सूर्यकुमार यादववरही कठोर कारवाईची मागणी केली. मात्र, आयसीसीने पाकिस्तानच्या दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या.
पीसीबीने 'यू-टर्न' का घेतला?
जेव्हा आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची एकही मागणी मानली नाही, तेव्हा अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. कारण पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी दुहेरी संकटात सापडले होते. एका बाजूला त्यांना देशाची इज्जत वाचवायची होती, तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळायचे होते. एका रिपोर्टनुसार, जर पाकिस्तानने टूर्नामेंटमधून माघार घेतली असती तर त्यांना १४१ कोटींचे नुकसान झाले असते. पीसीबीचे वार्षिक बजेट सुमारे २२७ दशलक्ष डॉलर्स आहे आणि आशिया कपमधून त्यांना १०६ ते १४१ कोटी रुपयांची (१२-१६ दशलक्ष डॉलर्स) कमाई होते. एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीच्या भीतीने पीसीबीने 'यू-टर्न' घेणे योग��य मानले.