उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) महाराजगंज (Maharajganj) जिल्ह्यातील किमान 11 विवाहित महिलांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) निधीचा गैरवापर (PMAY Scheme Fraud) केल्याचे पुढे आले आहे. योजनेचाल लाभ घेण्यासाठी सदर महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन 40,000 रुपयांचा प्रारंभिक हप्ता पदरात पाडून घेतला. त्यानंतर बाकीचे पैसे येण्याआधी आणि त्यासाठी आवश्यक पूर्तता करण्याऐवजी त्यांनी आपल्या प्रियकरांसोबत (Boyfriend) कथीतरित्या पळ काढला आहे. त्यामुळे पीएम आवास योजना लाभार्थी असलेल्या या महिलांनी सरकारची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.
महिला नवरा सोडून प्रियकरासोबत पळाल्या
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने असलेल्या PMAY योजनेचा या महिलांनी लाभ घेतला. योजनेच्या आर्थिक मदतीचा पहिला हप्ता मिळताच या महाराजागंज येथील महिलांनी आपल्या नवऱ्यापासून फारकत घेतली. नवऱ्याला तिथेच सोडले आणि आपल्या प्रियकरांसोबत पोबारा केला. या महिलांची संख्या मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत 11 इतकी झाली आहे. पत्नी पळून गेल्यानंतर या महिलांच्या पतींनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार पुढे आला. प्राप्त माहितीनुसार, या लाभार्थी महिला थुठीबारी, शीतलापूर, चाटिया, रामनगर, बकुल दिहा, खसरा, किशूनपूर आणि मेधौली या गावातील आहेत. या घटनांनंतर अधिकाऱ्यांनी दुसऱ्या हप्त्याची देयके थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, मुंबई महानगरात PMAY अंतर्गत घरांसाठीचा EWS उत्पन्नाचे निकष बदलले, कमकुवत घटकांसाठीच्या मर्यादेत 3 लाख रुपयांवरून 6 लाख रुपयांपर्यंत वाढ)
महिलांनी प्रत्येकी 50,000 रुपयांचा लाभ
दरम्यान, या भागात अशा प्रकारचा गैरवापर होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी, उत्तर प्रदेशातील चार विवाहित महिला PMAY योजनांतर्गत 50,000 रुपयांचे अनुदान घेऊन अशाच प्रकारे आपल्या प्रियकरासह फरार झाल्या होत्या. लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम सुरू झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्याने हा घोटाळा उघडकीस आला. या कुटुंबांना पाठवलेल्या नोटिसांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, ज्यामुळे पतींना इशारा देण्यात आला. चौकशीदरम्यान, पुढे समजले की, सदर लाभार्थी महिला नवरे सोडून प्रियकरांसबत पळाल्या आहेत.
महाराजगंजमधील सुमारे 2,350 प्राप्तकर्त्यांना अलीकडेच PMAY कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त झाला. नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे अधिका-यांनी असाच गैरवापर टाळण्यासाठी पुढील देयके थांबवली वृत्त न्यूज18 च्या वृत्तात म्हटले आहे. PMAY योजना कौटुंबिक उत्पन्नावर आधारित 2.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देते. विसंगतींच्या बाबतीत, अधिकारी लाभार्थ्यांकडून निधी परत मिळविण्याचा अधिकार राखून ठेवतात. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे PMAY योजनेच्या परिणामकारकता आणि निरीक्षणाबाबत चिंता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे अधिकारी आता वंचितांसाठी घरे बांधण्याच्या त्यांच्या हेतूसाठी निधीचा योग्य वापर केला जाईल याची खात्री करण्यासाठी अधिक दक्षता घेत आहेत.