Murder प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) फतेहपूरच्या (Fatehpur) लालौली येथे 2 दिवसांपूर्वी एका बांधकामाधीन घराच्या सेफ्टी टँकमध्ये एका मुलीचा नग्न मृतदेह सापडला होता. या घटनेबाबत मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा खुलासा केला आहे. या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या सगळ्यात आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ही संपूर्ण पूर्व योजना होती आणि ज्याचा मास्टरमाईंड दुसरा तिसरा कोणी नसून महिलेचा दुबईत असलेले पती होता.

अहवालानुसार, 20 जानेवारी रोजी लालौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावरील एका बांधकाम सुरू असलेल्या घराच्या सेफ्टी टँकमध्ये एका महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे दिसत होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हीच बाब स्पष्ट झाली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पाच पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

मिळलेल्या माहितीनुसार, दोन वर्षापूर्वी मृत 25 वर्षीय महिलेचा विवाह बिबीपूर येथील छोटू लोधीसोबत झाला होता. छोटू दुबईत खासगी नोकरीला होता आणि त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. आपल्या पत्नीचे आपल्या चुलत भावाशीही प्रेमसंबंध असल्याची त्याला शंका होती. यावरूनच दोघांमध्ये रोज भांडणे व्हायची. या रोजच्या भांडणांना कंटाळून पतीनेच स्वतःच्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला.

पत्नीचा खून करून घेण्यासाठी त्याने चुलत भाऊ नानकू उर्फ ​​सूरज याला तीन लाख रुपयांचे कंत्राट दिले. एक लाख रुपये आगाऊ आणि उर्वरित दोन लाख रुपये हत्येनंतर देण्याचे आश्वासन दिले होते. योजनेनुसार, आरोपी नानकू आणि त्याचे साथीदार रोहित, रामचंद्र, शिवम आणि सोनू यांनी या महिलेच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर या सर्वांनी महिलेचे अपहरण करून तिला एका बांधकामाधीन ठिकाणी नेले. तिथे या सर्वांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आणि नंतर विटेने तिचे डोके फोडून तिची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी तिचा विवस्त्र मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या घराच्या सेफ्टी टँकमध्ये फेकून दिला.

इकडे मुलगी घरी परत न आल्याने मुलीच्या पालकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पालकांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी तिचा दीर नानकूसोबत जत्रेत गेली होती, मात्र ती परत आली नाही. त्यानंतर नानकूचा शोध घेतला असता तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांचा नानकूवरील संशय वाढला. (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: 17 वर्षाच्या तरुणीची भरदिवसा गोळी घालून हत्या,आरोपी फरार, मेरठ येथील घटना)

पोलिसांनी ताबडतोब शोध मोहीम सुरु केली आणि 48 तासांत या खुनाची उकल केली. पोलिसांनी या प्रकणात चार आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी नानकू आणि या घटनेचा सूत्रधार दुबईत बसलेला महिलेचा पती छोटू पोलिसांच्या हाती लागले नसून लवकरच त्यांना अटक करण्याची पोलिसांची योजना आहे. दुसरीकडे, महिलेचे आपल्या दिराशी प्रेमसंबंध असल्याचेही समोर आले आहे. याला छोटूने अनेकवेळा विरोध केला, मात्र त्याची पत्नी हे मानण्यास तयार नव्हती. या प्रेमप्रकरणाची गावात चर्चा होती. म्हणूनच छोटूने पत्नीचा खून करण्यासाठी चुलत भावाला तीन लाख रुपयांची सुपारी दिली.