UP Election 2022: समाजवादी पक्षाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप
Akhilesh Yadav | (Photo Credit - Twitter)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Prades) योगी सरकारमधून राजीनामा देत बाहेर पडून अखिलेश यादव यांच्या समाजवादी (Samajwadi Party) पक्षासोबत जाण्याचे अनेक मंत्री आणि आमदारांचे प्रमाण वाढले आहे. त्याचे पडसाद आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.  कोविड निडमयांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत समाजवादी पक्षाच्या तब्बल 2500 कार्यकर्त्यांना ( Samajwadi Party Workers) यूपी पोलिसांनी (Uttar Pradesh Police) नोटीसा बजावल्या आहेत. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लखनऊचे पोलीस आयुक्त डी के ठाकूर यांनी म्हटले की, समाजवादी कार्यालयात कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने गौतमपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गौतमपल्ली पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक अजय कुमार सिंह यांनी म्हटले आहे की, 2500 सपा कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 (आदेशांचे उल्लंघन), 269 (साथरोग संसर्ग प्रसार, 270 (संसर्ग वाढवून दुसऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचवणे) आणि 341 (कोणत्याही नागरिकास चुकीच्या पद्धतीने रोखणे) यांसह महामारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सर्व कार्यकर्त्यांवर आरोप आहे की, जवळपास अडीच हजार सपा कार्यकर्त्यांनी सपा मुख्यालयाजवळ विक्रमादित्य मार्गावर अत्यंत बेजबाबदारपणे वाहतूक कोंडी केली. कोरोना संसर्ग वाढेल अशा पद्धतीने वर्तन केले.  (हेही वाचा, Dara Singh Chauhan Resigns: भाजपचा पाय खोलात, युपीमध्ये योगी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा)

पोलिसांनी सपा कार्यकर्त्यांना वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच गर्दी पांगविण्यासाठी लाऊड स्पीकरच्या माध्यमातून सूचना केल्या. मात्र, कार्यकर्त्यांनी नियम आणि कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांनी पीटीआय भाषाशी बोलताना सांगितले की, कोणालाही पाठीशी घाटले जाणार नाही. ज्यांनी नियम मोडला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार.