Dara Singh Chauhan | (Photo Credits-Twitter)

उत्तर प्रदेश विधानसभा (UP Assembly Polls 2022) निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाला (BJP) अवघ्या 24 तासात दुसरा धक्का मिळाला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्यानंततर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारमधील दुसरे ओबीसी मंत्री दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत भाजपमधील 6 नेत्यांनी पक्ष सोडला आहे. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, दारा सिंह चौहान हे लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करतील. देशाच्या राजकीय पटलावर उत्तर प्रदेश राज्याचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीस मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या रणधुमाळीत महत्त्वाच्या पदांसह आमदार असलेल्या सहा नेत्यांनी पक्ष सोडल्याने भाजपला मोठा झटका बसला आहे. अवघ्या दोन दिवसात दोन मंत्री आणि चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत आहे. मात्र, अखिलेश यादव यांनी भाजपसमोर जोरदार आव्हान निर्माण केले आहे. काँग्रेसही बऱ्यापैकी जम बसवताना दिसतो आहे. (हेही वाचा, UP Assembly Polls 2022: माझ्या जाण्याने भाजपमध्ये भूकंप, 14 तारखेला भूमिका स्पष्ट करणार- स्वामी प्रसाद मौर्य)

दारा सिंह चौहान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी पूर्ण क्षमतेने काम केले. मात्र, मागास, वंचित आणि दलित वर्ग, शेतकरी आणि बेरोजगारांना या सरकारने काहीच दिले नाही. सरकारचा या सर्व वर्गांविरोधात कारभार आहे. सरकारचे मागास आणि दलिदांबाबत असलेल्या भूमिकेमुळे त्रस्त होऊन आपण राजीनामा देत आहोत.

योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मोर्य यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला होता. मोर्य हे उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रमुख ओबीसी चेहरा मानले जातात. त्यांच्यासोबत भाजपच्या चार आमदारांनीही राजीनामा दिला आहे यात जिनमें बृजेश प्रजापति, रोशन लाल, भगवती सागर, आणि विनय शाक्य यांचा समावेश आहे. मौर्य यांनी मायावती यांचा बसप सोडत 2017 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला होता.