उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Polls 2022) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारसाठी तितकी सोपी राहिली नसल्याचे चित्र आहे. भाजपमधून मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि आमदार बाहेर पडत असून, त्यांनी आपल्या पदांचा राजीनामाही दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) हे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधून बाहेर पडणारे पहिले मंत्री ठरले आहेत. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी म्हटले आहे की, माझ्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये भूकंप आला आहे. मी भाजपला ठोकर देऊन बाहेर पडलो आहे. त्यामुळे त्यामुळे पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. समाजवादी (SP) पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पुढील भूमिका येत्या 14 जानेवारी रोजी स्पष्ट केली जाईल. सहकारी नेते आणि कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुढे बोलताना सांगितले की, आता केवळ सरकारमधून बाहेर पडलो आहे. लवकरच भाजपमधूनही बाहेर पडणार आहे. सध्यातरी मी समाजवादी पक्षात प्रवेश करत नाही आहे. मात्र, सहकाऱ्यांशी बोलून येत्या 14 तारखेला सर्व पत्ते ओपन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठोकर मारुन भाजपमधून बाहेर पडलो आहे. आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यामुळे भाजपमध्ये भूकंप आला आहे. मी भाजप सोडू नये यासाठी माझी मनधरणी करण्याची जबाबदारी भाजपने केशव प्रसाद मौर्य यांच्यावर दिली आहे. केशव मौर्य हे माझे छोटे भाऊ आहेत. मात्र, पाच वर्षांपासून तेही भाजपमध्ये बिच्चारेच झाले आहेत. माझ्यासोबत इतरही काही मंत्री येणार आहेत. तसेच, आमदारही येणार आहेत. माझा जोही निर्णय असेल तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा असेल. हा निर्णय मी 14 तारखेला जाहीर करणार आहे. माझी मुलगी संघमित्रा मौर्य ही बदायूं येथून भाजप खासदार आहे. त्या स्वत: त्यांचा निर्णय घेतील, असेही मौर्य म्हणाले. (हेही वाचा, UP Assembly Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात लढणार, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी- शरद पवार)
ट्विट
दलितों, पिछड़ों, किसानों, बेरोजगार नौजवानों एवं छोटे-लघु एवं मध्यम श्रेणी के व्यापारियों की घोर उपेक्षात्मक रवैये के कारण उत्तर प्रदेश के योगी मंत्रिमंडल से इस्तीफा देता हूं। pic.twitter.com/ubw4oKMK7t
— Swami Prasad Maurya (@SwamiPMaurya) January 11, 2022
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंत चार आमदारांनी भाजपला धक्का दिला आहे. यात बांदा जिल्ह्यातील तिंदवारी येथील विधानसभा मतदारसंघातील बृजेश कुमार प्रजापती, शाहजहांपूर जिल्ह्यातील तिलहर विधानसभा मतदारसंघातील राशन लाल वर्मा, कानपूर देहात येथील बिल्हौर येथील आमदार भगवती सागर आणि विनय शाक्य यांचा समावेश आहे. मंत्री पदावर असलेल्या आमदाराने दिलेल्या राजीनाम्यात स्वामी प्रसाद मौर्य हे सध्यातरी एकटेच आहेत.