Unlock-5 Guidelines: गृह मंत्रालयाने केली अनलॉक-5 मार्गदर्शक तत्वांच्या मुदतीमध्ये वाढ; Containment Zones मध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन कायम 
Unlock | प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) शिरकाव झाल्यानंतर सरकारने लॉकडाऊन (Lockdown) जारी केले होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम लागू होते. त्यानंतर हळू हळू त्यामध्ये शिथिलता आणत आता देशात अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. आता गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) नवीन परिपत्रक जारी करत यामध्ये पुढील दोन महिने काही बदल होणार नसल्याचे सांगितले आहे. गृह मंत्रालयाने, दि 30.09.2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मूदतवाढ देऊन त्या 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहण्याचे आदेश जारी केले आहेत.

24 मार्च 2020 रोजी गृह मंत्रालयाकडून लॉकडाउन उपायांसाठी पहिला आदेश जारी केल्यापासून आतापर्यंत, कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात हळूहळू जवळपास सर्व क्रिया सुरु केल्या गेल्या आहेत. बर्‍याच उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, परंतु मोठ्या संख्येने लोकांचा समावेश असलेल्या काही क्रियाकलापांना काही निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे. या उपक्रमांमध्ये - मेट्रो रेल, शॉपिंग मॉल्स; हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, धार्मिक स्थळे, योग आणि प्रशिक्षण संस्था, व्यायामशाळा, चित्रपट गृह व मनोरंजन पार्क इ. गोष्टींचा समावेश आहे.

दुसरीकडे, अशा काही गोष्टी आहे ज्यांच्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे, या गोष्टींबाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी निर्णय घ्यावेत असे सांगण्यात आले आहे. या क्रियाकलापांमध्ये- शाळा आणि प्रशिक्षण संस्था; संशोधन अभ्यासकांसाठी राज्य आणि खासगी विद्यापीठे, 100 लोकांपेक्षा जास्त गर्दी होणारे मेळावे यांचा समावेश आहे.

30 सप्टेंबर रोजी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर, काही निर्बंधासह पुढील क्रियाकलापांना देखील परवानगी आहे –

  • गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या प्रवाश्यांचा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास
  • खेळाडुंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलावाचा उपयोग
  • व्यवसाय ते व्यवसाय (Business to Business) उद्देशाने प्रदर्शन हॉल
  • सिनेमे/थिएटर/मल्टिप्लेक्स यांचा 50 टक्के आसन क्षमतेसह वापर

सामाजिक/शैक्षणिक/खेळ/करमणूक/सांस्कृतिक/धार्मिक/राजकीय कार्ये आणि इतर मंडळे हे बंद जागांमध्ये हॉल क्षमतेच्या जास्तीत जास्त 50% लोकांसह आणि 200 जणांच्या कमाल मर्यादेपर्यंत.

गृह मंत्रालयाने सांगितले आहे की, 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाईल. जिल्हा प्रशासनाद्वारे सूक्ष्म पातळीवर कंटेनमेंट झोनची मर्यादा निश्चित केली जाईल. या कंटेनमेंट झोनमध्ये कठोर काटेकोर उपाय लागू केले जातील आणि केवळ आवश्यक क्रियाकलापांना परवानगी दिली जाईल. हे कंटेनमेंट झोन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे सूचित केले जातील. (हेही वाचा: Unlock 5: केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर; 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृह, मल्टिप्लेक्स उघडण्याची परवानगी)

गृह मंत्रालयाने सांगितले आहे की, जरी नियमांमध्ये शिथिलता आणली गेली असली तरी याचा अर्थ असा होत नाही की ही महामारी संपली. लोकांनी पहिल्यासारखी काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कचा वापर, हात धूत राहणे, एकमेकांमध्ये 6 फुटांचे अंतर अशा गोष्टी पाळायला हव्यात.