Nirmala Sitharaman | (Photo Credits-Facebook)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प (Union Budget 2021-22) संसदेत सादर करत आहे. आज (1 फेब्रुवारी 2021) सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प संसदेत सादर होईल. तत्पर्वी काँग्रेस पक्षाने ट्विट करुन अर्थसंकल्पाबाबत भाष्य केले आहे. विचार आणि क्रियेची गतिहीनता यातून बाहेर पडण्यासाठी हा अर्थसंकल्प लोकांच्या आपेक्षा पूर्ण करणार का? असे म्हणत लोकांच्या आशा आकांक्षांच्या कसोटीवर हा अर्थसंकल्प उतरणार का, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी हे ट्विट केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता काहीच वेळ बाकी राहिला आहे. कोरोना व्हायरस संकटानंतर सादर होणारा हा पहिलाच केंद्रीय अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात मोठा परिणाम सहन करावा लागलेल्या अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्यासाठी हा अर्थसंकल्प काय देतो याबाबत मोठी उत्सुकता आहे. (हेही वाचा, Union Budget 2021 Live Streaming: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या Doordarshan, DD News सह युट्युब लिंक वरील थेट प्रक्षेपण इथे पहा!)

अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारसमोर आव्हानेही तितकीच मजबूत आहेत. विकासदरवृद्धीसोबतच उद्योजक आणि विविध क्षेत्रांना दिलासा देत असताना सर्वसामान्यांच्या झोळीतही बरेच काही टाकण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. कोरोना काळात लकडाऊन असताना केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे. परंतू, ते फारसे प्रभावी ठरलेच नाही. त्यामुळे आता केंद्र सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या पदरात काय दान टाकते याबाबत उत्सुकता आहे.

सर्वाधिक उत्सुकता आहे की, अर्थसंकल्पात शेती, उद्योग, ऑटो आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला काय मिळते. याशिवाय नोकरदार वर्ग आणि मध्यमवर्गाचे समाधान करण्यात हा अर्थसंकल्प किती आणि कसा यशस्वी ठरतो. शिवाय तळागाळात असणाऱ्या गरीब वर्गाला गरीबीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार काही योजना, सवलत जाहीर करते का? याबाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.