Uddhav Thackeray | (Photo Credit: X)

शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादा आणि चौकट याच्या पलीकडे जाऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला असल्याचा शिवसेना (UBT) पक्षाचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (16 जानेवारी) जाहीर पत्रकार परिषद (Uddhav Thackeray Press Conference Today) घेणार आहेत. ज्याचे वर्णन महापत्रकार परिषद असे करण्यात आले आहे. जी वरळी डोम (Mumbai Worli Dome) येथे दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र दै. सामनाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, पक्षप्रमुख विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चीरफाड करणार आहेत. त्यासाठी जनतेच्या दरबारात महापत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

'सत्य ऐकून विचार करा'

उद्धव ठाकरे घेत असलेली पत्रकार परिषद 'सत्य ऐकून विचार करा' या शीर्षकाखाली घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद म्हणजे जनता न्यायालय असून त्यासाठी सामान्य नागरिकांनाही उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे. या वेळी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख हे आपली भूमिका प्रसारमाध्यमांद्वारे जनतेच्या कोर्टात मांडणार आहेत. सांगितले जात आहे की, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या प्रत्येक मुद्द्यावर आणि घटेतील तरतूद यांच्या आधारे सर्व बाबींवर भाष्य केले जाणार आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray Approaches Supreme Court: उद्धव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान)

शिवसेना प्रकरणी सर्वांगीण मुद्द्यांवर भाष्य होण्याची शक्यता

दुपारी तीन ते साडेतीन वाजता ही पत्रकार परिषद सुरु होईल. ज्यामध्ये शिवसेना पक्ष, पक्षाची घटना, घटनेत करण्यात आलेले बदल, पक्षप्रमुखांचे अधिकार, शिवसेनेतील बंड, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना नोंदवलेली निरीक्षणे, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या सुनावण्या, विचारात घेतलेले मुद्दे आणि एकूण निकालाबाबत (विधानसभा अध्यक्ष) असलेली विसंगती या सर्व बाबींवर चौफेर भाष्य केले जाणार आहे. (हेही वाचा, Saamana Attacks On Bjp: 'नार्वेकरांनी भाजपच्या टेस्ट ट्यूब बेबीचं रूपांतर खऱ्या शिवसेनेत केलं'; UBT मुखपत्र 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र)

विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याची शक्यता

शिवसेना (UBT) गटाकडून सांगितले जात आहे की, सामान्य नागरिक, शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, वेगवेगल्या राजकीय पक्षांमधील मान्यवर, कायदेतज्ज्ञ, निवडणूक तज्ज्ञ, कायदा शिकणारे विद्यार्थी, सामाजिक संघटना आदींचेही प्रतिनिधी यांच्यासह राजकीय विश्लेषकसुद्धा या पत्रकार परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दुसऱ्याय बाजूला विधानसभा अध्यक्ष्यांनी म्हटले आहे की, कोर्टात याचिका दाखल झाली म्हणजे माझा निर्णय चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही. न्यायालयात माझा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध करावे लागेल. तसे घडले तरच निर्णय फिरवला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दस्तुरखुद्द राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.