Coronavirus (Photo Credits: MAHARASHTRA DGIPR)

मागच्यावर्षी कोरोना विषाणूवर (Coronavirus) समाधानकारक विजय मिळविल्यानंतर यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Covid-19 Second Wave) भारतात हाहाकार माजवला. यंदा बेड्सची कमतरता, ऑक्सिजन-औषधांचा तुटवडा अशा अनेक गोष्टींना भारतीयांना सामोरे जावे लागले. आता भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट जुलैपर्यंत संपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच वेळी, पुढील 6 ते 8 महिन्यांत संसर्गाची तिसरी लाट (Covid-19 Third Wave) येण्याचीही शक्यता आहे. विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने गठीत केलेल्या तीन सदस्यांच्या पॅनेलद्वारे याचा अंदाज लावला आहे.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, SUTRA मॉडेलचा उपयोग करून वैज्ञानिकांनी असा अंदाज लावला आहे की, मेच्या अखेरीस दररोज 1.50 लाख प्रकरणे आणि जूनअखेरीस 20,000 नवीन प्रकरणे आढळतील. पॅनेलचे सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा या राज्यांत तसेच दिल्ली आणि गोव्यासारख्या राज्यातही कोरोनाचा पीक संपला आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट किमान ऑक्टोबर 2021 पर्यंत येणार नाही.

या मॉडेलच्या सूचनेनुसार, तामिळनाडूमध्ये 29 ते 21 मे आणि पुडुचेरीमध्ये 19-20 मे दरम्यान पीक दिसून येईल. अहवालानुसार, अद्याप पूर्व आणि ईशान्य भारतात कोरोनाचा पीक दिसून आला नाही. आसाममध्ये 20-21 मे, मेघालयात 30 मे आणि त्रिपुरामध्ये 26-27 मे रोजी पीक दिसू शकेल. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये अजूनही प्रकरणे वाढतच आहेत. हिमाचल प्रदेशात 24 मे रोजी आणि 22 मे रोजी पंजाबमध्ये पीक येऊ शकेल.

या मॉडेलच्या अंदाजानुसार, कोरोना संसर्गाची तिसरी लाट 6 ते 8 महिन्यांत भारतात येऊ शकते, मात्र त्याचा परिणाम कमी करता येऊ शकतो. प्राध्यापक अग्रवाल म्हणाले, ‘तिसऱ्या लाटेमध्ये संसर्ग स्थानिक पातळीवर पसरेल आणि बर्‍याच लोकांना त्याचा त्रास होणार नाही कारण तोपर्यंत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असेल. (हेही वाचा: Mucormycosis ला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना निर्देश, सर्व प्रकरणांचा अहवाल देण्याच्याही सूचना)

आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार, अँटीबॉडी कमी झाल्यास प्रतिकार क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, लसीकरण वाढविले पाहिजे. यासह कोविड-19 चा प्रसार रोखण्यास मदत करणारे नियम पाळले पाहिजेत.