File image of an Air India flight (Photo Credits: ANI)

जगभरात एक मोठे संकट म्हणून उद्भवलेल्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी, सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) मुळे अनेक भारतीय नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन' (Vande Bharat Mission) सुरू केले आहे. सध्या या मोहिमेचा पहिला टप्पा सुरू आहे. एअर इंडिया (Air India) आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेसने या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 ते 22 मे दरम्यान चालणार्‍या या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात, एअर इंडिया 31 देशांसाठी 149 विमाने चालवण्याचे विचार करीत आहे.

एएनआय ट्विट -

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 7 मे ते 14 मे या कालावधीत एअर इंडिया 12 देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 15,000 भारतीयांना परत आणण्यासाठी 64 विमाने चालवित आहे. एअरलाईनचे अधिकारी म्हणाले, मिशनच्या दुसर्‍या टप्प्यात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस अमेरिका, संयुक्त अरब अमिराती (युएई), कॅनडा, सौदी अरेबिया, ब्रिटन, मलेशिया, ओमान, कझाकस्तान, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, कतार आणि इंडोनेशिया इत्यादी देशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 149 विमाने चालवतील. या देशांव्यतिरिक्त दुसर्‍या टप्प्यात बहरेन, अर्मेनिया, थायलंड, इटली, नेपाळ, बेलारूस, नायजेरिया आणि बांग्लादेश तसेच रशिया, फिलिपिन्स, फ्रान्स, सिंगापूर, आयर्लंड, किर्गिस्तान, कुवैत, जपान, जॉर्जिया, जर्मनी आणि ताजिकिस्तान या देशांच्या विमानांचा समावेश आहे. (हेही वाचा: Air India च्या कर्मचार्‍याला कोरोना विषाणूची लागण; दिल्ली येथील मुख्यालय केले सील)

वंदे भारत मिशन अंतर्गत, भारतात परतणारे लोक विमानाचा व त्यांच्या विलगीकरणाचा खर्च स्वतः करत आहेत. या मोहिमेमध्ये, वृद्ध, गर्भवती महिला, विद्यार्थी, आजारी किंवा ज्यांच्या घरात कोणाचा मृत्यू झाला आहे किंवा कोणी आजारी आहे अशांना प्राधान्य दिले जात आहे. आज पहिल्या फेजचा सहावा दिवस आहे व आज 9 देशांमधून 12 विमानांमध्ये भारतीय परत येणार आहेत.