Sushant Singh Rajput Suicide Case: सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड प्रकरणी रिया चक्रवर्ती च्या चौकशीची सध्या गरज नाही : बिहार पोलिस
बिहार पोलिस । Photo Credits: Twitter/ ANI

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचं गूढ उकलण्यासाठी आता मुंबई मध्ये बिहार पोलिस देखील दाखल झाले आहेत. दरम्यान आज मुंबई पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर ऑटो रिक्षाने परतताना मीडीयाशी त्यांनी बातचीत केली. यावेळेस सध्या रिया चक्रवर्ती ची चौकशी करण्याची गरज नाही मात्र ती आमच्या निगराणीमध्ये असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान सुशांत सिंहच्या कुटुंबाने त्याच्या आत्महत्येसाठी रियाला जबाबदार धरत पटणा मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आता तपासाला वेग आला आहे. बिहार पोलिसांची टीम सध्या मुंबईमध्ये दाखल असून ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळेस मुंबई पोलिस सहकार्य करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

रियाने काल एक व्हिडिओ शेअर करत 'माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे मला न्याय जरुर मिळेल. सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होईल.' असा मेसेज देणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक बोलू शकत नाही. तसा वकिलांचा सल्ला आहे असे देखील रियाने म्हटले आहे. (सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येविषयी अंकिता लोखंडे हिने केला गौप्यस्फोट; म्हणाली 'तो कधीच डिप्रेशनमध्ये नव्हता').

बिहार पोलिस

दरम्यान रिया आणी सुशांत सिंह राजपूत रिलेशनशीपमध्ये होते. त्याच्या आत्महत्येच्या पूर्वी त्यांच्यात वाद झाल्याने ती घर सोडून गेली होती. मात्र नेमकं सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय? हे वैयक्तिक होते की बॉलिवूड मधून मिळणारी दुय्यम वागणूक या दोन्ही बाजूंनी तपास सुरू आहे. सुशांतच्या बहिणीनेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत तपासामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

सुशांतसिंह राजपूतने 14 जून दिवशी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळेस त्याचे मित्र देखील घरीच उपस्थित होते. बराचवेळ सुशांत बाहेर येत नाही हे लक्षात येताच त्यांनी दरवाजा ठोठावला असता त्याने आत्महत्या केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.