
बेळगाव (Belgaum) येथे आज कन्नड संघटनांचा धिंगाणा पाहायला मिळाला आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध घोषणाही दिल्या. शिवसैनिकांनी कोल्हापूर येथे केलेल्या आंदोलनादरम्यान, कन्नड संघटनेचा झेंडा जाळला होता, या गोष्टीला प्रत्युत्तर म्हणून या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात भीमाशंकर पाटील (Bhimashankar Patil) यांनी बेताल वक्त्यव्य केले होते. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी त्याला तसेच करड्या भाषेत प्रत्युत्तर दिले. मात्र आता हा वाद चांगलाच चिघळला गेला असल्याचे दिसत आहे.
‘महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते. त्याला उत्तर देताना, ‘कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसे, याचे उदाहरण घालून देऊ’ असा इशारा धैर्यशील माने यांनी दिला होता. याच वादाचे हे पडसाद असलेले दिसत आहे. यावेळी शहरातील मराठी पाट्यांवर दगडफेकही करण्यात आली. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात हिटलरचा पुनर्जन्म झाला आहे- जितेंद्र आव्हाड)
भीमाशंकर पाटील यांच्या वक्त्यव्यानंतर कोल्हापूर येथे आंदोलन झाले होते. त्यावेळी ही बातमी बेळगावात पोचल्यावर कन्नड संघटनांनी एकत्र येऊन, सर्किट हाऊस परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. याची सुरुवात झाली होती हिवाळी अधिवेशनात. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल भर सभागृहात केंद्र सरकारला केला होता.