उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी (Mahtama Gandhi Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकदाच वापर करता येणाऱ्या प्लस्टिकच्या वापरावर निर्बंध (Plastic Ban) लावण्यात येणार आहे. पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळावी याकरिता ही सक्तीची बंदी लावण्यात येईल, या उपक्रमात देशवासीयांनी सहकार्य करावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील आवाहन केले आहे.
मन की बात मध्ये बोलत असताना 2022 पर्यंत देशाला पूर्णतः प्लस्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी आपल्या सवयी बदलाव्यात असेही मोदी म्हणाले होते. प्राप्त माहितीनुसार, या प्लास्टिक हटाव योजनेअंतर्गत केवळ एकदाच वापरता येणारे प्लास्टिक जसे की प्लास्टिक कप, स्ट्रॉ, पिशव्या यांना ग्रामीण व शहरी अशा सर्व स्तरावरून हटवण्यात येणार आहे.
सरकारी निर्णयानुसार यापुढे प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक कप, प्लास्टिक स्ट्रॉ, सॅशे पाऊच, 35 mm हुन कमी जाडीच्या हॅन्डल सोबत किंवा शिवाय येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या ,थर्माकॉल कप, प्लेट्स, बश्या, चमचा, स्ट्रॉ , डेकोरेशन साठी वापरण्यात येणारे थर्माकोल किंवा प्लास्टिक (उदा.मखर) , वस्तूंसाठी पॅकेजिंग म्हणून वापरण्यात येणारे थर्माकोल व प्लास्टिक यावर बंदी असणार आहे. असं असलं तरी काही विशिष्ट प्रकारच्या प्लस्टिक वापरावर अद्याप बंदी आणलेली नाही, म्हणजेच पुनर्वापर होऊ शकणारे प्लास्टिक जसे की 35 mm हुन अधिक जाडीच्या पिशव्या, निर्मिती प्रक्रियेत वापरले जाणारे प्लास्टिक याचा वापर करता येणार आहे.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र्रात देखील अशाच प्रकारे प्लास्टक बॅन करण्यात आले होते. यावेळेस तब्बल 6 महत्वपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंच्या वापरावर बंदी आणल्याने येत्या काळात तब्बल 14 मिलियन टन्स वापर घटण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लॅस्टिकच्या वापरवरील बंदी पासून ते निर्मिती पर्यंत निर्बध लागवण्यात येणार आहे.