
काही दिवसांपूर्वी पबजी (PUBG) गेमशी संबंधित एक खळबळजनक घटना उघडकीस आली होती. लखनऊमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाने आईने पबजी खेळण्यास मनाई केल्यामुळे तिची हत्या केली होती. त्यानंतर आंध्र प्रदेशात एका 15 वर्षीय मुलाने पबजीमध्ये हरल्यामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. आता ऑनलाइन गेम पबजीमध्ये 2 लाख रुपये गमावल्यानंतर, रविवारी रात्री ओडीसा (Odisha) येथील बालीकुडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनातपूर चौकी अंतर्गत असलेल्या भौसिनी (Bhuasini) गावात एका 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देबेंद्र परिडा असे या तरुणाचे नाव असून, तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. पैशाच्या लालसेने त्याने हा खेळ खेळायचा सुरुवात केली आणि पुढे त्याला पबजीचे व्यसन जडले. काही कालावधीत त्याने हा गेम खेळताना 2 लाख रुपये गमावले होते. यामुळे त्याचे आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडणही झाले. या भांडणानंतर वडिलांनी मुलाला खेळापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.
खेळात 2 लाख रुपये गमावल्याने आलेले नैराश्या तसेच आता खेळ खेळण्यापासून वंचित राहिल्याने देबेन्द्रने रविवारी रात्री गळफास घेतला. या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अंत्यसंस्कारासाठी स्थानिक स्मशानभूमीत हलवले, तेव्हा स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जगतसिंगपूर येथील जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आला. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशमधील शिवपुरीमध्ये खेळताना गळ्यात दोरी अडकल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू)
तरुणाला पबजी खेळाचे व्यसन लागले असल्याची माहिती अनतपूर चौकीचे प्रभारी अधिकारी अनिरुद्ध नायक यांनी दिली. नायक म्हणाले, ‘प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की देबेन्द्रने पबजी खेळताना 2 लाख रुपये गमावले आहेत, ज्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला फटकारले होते. यामुळे निराश होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलले.’ याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.