Shiv Sena on BJP: त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा; शिवसेनेचे भाजप, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Dainik Saamana Editorial) संपादकीयातून भाजप (BJP) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि केंद्र सरकार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणांवरुन भाजप नेते टीका करत आहेत. या टीकेचा जोरदार समाचार सामना संपादकीयातून घेण्यात आला आहे. 'कमी प्रतीचा गांजा' या मथळ्याखाली छापण्यात आलेल्या लेखामध्ये 'ज्या पद्धतीची वक्तव्य भाजपाचे नेते करत आहेत, ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे', असे म्हटले आहे.

सामना संपादकीयात म्हटले आहे की, 'दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळय़ा भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?’’ अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?' (हेही वाचा, Shiv Sena On BJP: हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? शिवसेनेचा भाजप सरकारला सवाल)

भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पुढे करुन अजित पवार यांच्या साथीने स्थापन केलेल्या पहाटेच्या सरकार आणि शपथविधीवरुनही शिवसेनेने भाजपला सुनावले आहे. लेखात म्हटले आहे की, 'उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत व ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. दुसरे असे की, उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले याचा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे बहुमत झाले व त्यांनी आपला नेता निवडला. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीस तसा अर्थ नाही'.

'उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच राज्यपालांनी शपथ दिली आहे व त्या घटनात्मक विधीस स्वतः फडणवीस उपस्थित होते. शपथविधीचा झगमगता सोहळा पाहून त्यांचेही डोळे दिपलेच असतील. डोळे दिपणे व डोळे फिरणे यात पुन्हा फरक आहे. महाराष्ट्रात भाजपाचे डोळे फिरले आहेत. त्यातून जो तिरळेपणा निर्माण झाला, त्यावर उपचारांची गरज आहे. ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर, सूडबाजीवर घणाघात केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या हक्क आणि अधिकारांचे हनन चालवले आहे. राज्यांना काम करू द्यायचे नाही. विशेषतः ज्या राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री नाहीत, तेथे तर केंद्रीय तपास यंत्रणांचा मुक्त हैदोस घातला जात आहे. भाजपाकडून सीबीआय, ईडी, आयटी व एनसीबीचा वापर स्वतःची बटीक असल्यासारखा केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या आडून जे ‘शिखंडी’ पद्धतीचे राजकारण हे लोक करीत आहेत, त्याचा बुरखाच ठाकरे यांनी फाडला. ‘‘हिंमत असेल तर मर्दासारखे अंगावर या’’ असा आव्हानात्मक पवित्रा ठाकरे घेतात तेव्हा भाजपाने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी', असेही सामनात म्हटले आहे.

दरम्यान, 'महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर हल्ला करणे समजू शकतो, पण त्यांच्या कुटुंबाचाही छळ करून भाजपावाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवीत आहेत. ‘पदरा’आडचे नवे घाणेरडे राजकारण सुरू आहे. पडद्यामागे पूर्वी बरेच काही घडत असे. आता पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर भाजपने सुरू केला आहे. आपल्या देशात हे नवे पायंडे भाजपाने पाडले आहेत. भाजपाने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारून पुढे जायला हवे. राजकारणात हे असे चढ-उतार येतच असतात. सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात. भाजपाचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा. ‘‘एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात’’ असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजपा पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने या सगळय़ाचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजपा नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल', अशी टोलेबाजी सामना संपादकीयातून करण्यात आली आहे.