ठाकरे सरकार पडल्यानंतर आता शिंदे सरकार जोरदार चर्चेत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी बाकावर गेले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) औरंगाबाद (Aurangabad) येथे अनेक विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन मी नाराज आहे. या निर्णयाबाबत सुसंवाद नव्हता. हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली, असे शरद पवार म्हणाले. हा निर्णय आतिश्य घाईने घेतलेला आहे, या निर्णयाबाबत मला कोणतही कल्पनाही नव्हती. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं. पण मूलभूत समस्यांकडे अधिक लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं."
शिंदे यांचं बंड एका दिवसात झालं नाही
शरद पवार पुढे म्हणतात, एकनाथ शिंदे यांचं बंड एका दिवसात झालं नाही. तसेच त्यांच्या बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नसल्याचे पवार म्हणाले. बंडखोरांना पुढे येऊन जनतेला खरं कारण सांगावं लागेल. 2024 साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावं अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असं पवार म्हणाले. मध्यावधी निवडणुका लागतील असं मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असं सांगितलं आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागलं पाहिजे. (हे देखील वाचा: CM Eknath Shinde on Shiv Sena: महाराष्ट्रातील घटनेची जगभरातील 33 देशांनी दखल घेतली; शिवसेनेतील बंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य)
राज्यपालांवर निशाना
बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली. अशी तत्परता दाखवणारे पहिले राज्यपाल असतील. राज्यपालांना अधिक अनेक कष्टाचे काम असेल्याने त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण पहिल्यांदाच त्यांनी 48 तासांत बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले अशी टीका पवारांनी राज्यपालांवर केली आहे.