जगातील बड्या देशांनी पाकिस्तानवर (Pakistan) टाकलेल्या दबावांनंतर आज अखेरीस लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला (Hafiz Saeed) पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पण हाफिज सईद याला करण्यात आलेली अटक म्हणजे पाकिस्तानचं ढोंग असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी म्हटलं आहे. या ढोंगाला न भुलता भारताने सावध राहिलं पाहिजे असा सल्लाही निकम यांनी दिला आहे.
उज्ज्वल निकम यांनी हाफिज सईदच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हे भारताच्या कुटनीतीचं यशस्वी पाऊल आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद विरोधातील जे पुरावे सादर केले त्यामुळे पाकिस्तानचा नाईलाज झाला आणि त्यांनी कारवाई केली. पण हे पाकिस्तानचं ढोंग वाटत आहे. त्यामुळे भारताने सावध राहिलं पाहिजे”.“हाफिज सईदला अटक केल्याचं सांगत जगाची फसवणूक करत आहे. पण ते न्यायालयात काय पुरावे सादर करतात आणि त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न करतात हे पहावं लागेल. अन्यथा हे नाटक आहे”, असं निकम यांनी सांगितलं आहे
Ujjwal Nikam, special public prosecutor in the 26/11 Mumbai terror attack case on arrest of Hafiz Saeed: Pakistan is fooling the world that they have arrested him, we have to see how they produce evidence in courts and how efforts are made to convict him, otherwise it is a drama. pic.twitter.com/tvRToS0j6q
— ANI (@ANI) July 17, 2019
काही वेळापूर्वीच हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली. हाफिजला अटक करुन तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, आज भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी सुद्धा आंतराष्ट्रीय न्यायालयात अंतिम फैसला होणार आहे.