Medical Workers (Photo Credits: IANS)

सध्या देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्या दिवसाला 90 हजाराच्या आसपास पोहोचल्या आहेत. ज्या वेगाने हा संसर्ग वाढत आहे हे पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु कोरोना व्हायरसचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणत आहेत की, मार्चमध्ये कोरोनाची वाढ ही फक्त एक झलक आहे. त्यांनी असा अंदाज वर्तविला आहे की, मध्य एप्रिलमध्ये कोरोना विषाणू संसर्ग शिगेला पोहोचेल. मात्र शास्त्रज्ञांच्या मते, मेच्या अखेरीस संसर्गाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होऊ शकते. शास्त्रज्ञांनी गणिताचे मॉडेल वापरुन हा अंदाज लावला आहे. देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी याच मॉडेलच्या आधारे पुढील अंदाज वर्तविला होता.

भारतातील कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान, ‘सूत्र’ नावाच्या या गणिती पध्दतीनुसार अंदाज वर्तविला होता की, ऑगस्टच्या सुरवातीस कोरोनाची प्रकरणे वाढतील आणि सप्टेंबरपर्यंत ती पिकला पोहोचतील व पुढे फेब्रुवारी 2021 मध्ये ती कमी होतील. आयआयटी कानपूरच्या मनिंद्र अग्रवाल यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी संसर्गाच्या सध्याच्या वाढीचा अंदाज वर्तविण्याकरिता याच मॉडेलचा उपयोग केला. यामध्ये असे दिसून आले की, जागतिक साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या मध्यात दैनंदिन संसर्गाची नवीन प्रकरणे वाढतील.

अग्रवाल म्हणाले, ‘गेल्या कित्येक दिवसांतील प्रकरणे पाहता आम्हाला आढळून आले आहे की, 15 ते 20 एप्रिल या काळात भारतातील कोरोना प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढतील. हा खूप वेगवान वाढणारा आलेख आहे, परंतु प्रकरणांमध्ये घटही तितक्याच वेगाने होईल. मेच्या अखेरीस प्रकरणे फारच कमी होतील.’ अंदाजानुसार पंजाब व महाराष्ट्रातील कोरोना प्रकरणे खूप वाढतील. (हेही वाचा: भारतात 2 एप्रिलला करण्यात आल्या 10,46,605 कोरोना चाचण्या- ICMR)

दरम्यान, शुक्रवारी 11 राज्यांच्या मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी माहिती दिली की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाची गती जास्त आहे. या बैठकीत सांगण्यात आले की गेल्या वर्षी जूनमध्ये कोरोनाचा दर सर्वाधिक 5.5 टक्के होता, तर यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा दर 8.8 टक्के नोंदविला गेला.