तब्बल 4 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. याबाबत राज्य सरकार उपययोजना राबवत आहेच, मात्र आता केंद्र सरकरनेही परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहून म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट (Second Wave of COVID-19) सुरु होत आहे आणि राज्यातील अधिकारी साथीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यातील अधिकारी ट्रॅकिंग, चाचणी आणि सक्रिय रुग्णांच्या आयसोलेशनकडे योग्यरित्या लक्ष देत नाहीत. याशिवाय नागरिक नियम पाळत नसल्याबद्दलही केंद्राने चिंता व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात कोविड-19 ची दुसरी लाट सुरु होत आहे. सध्या राज्यात ट्रॅकिंग, चाचणी, सक्रीय रुग्ण वेगळे ठेवणे याबाबत फार कमी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठीच्या नियमांचे पालन केले जात नाही.’
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात असे सूचित केले गेले आहे की, ‘लोकांवर नजर ठेवणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत तिथे SARI आणि ILI रुग्ण शोधण्यावर भर दिला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक सक्रिय रूग्णाच्या 20 ते 30 संपर्कांचा शोध घेण्यात यावा. मर्यादित संपर्क ट्रेसिंगमुळे लक्षणे नसणारे आणि लक्षणे दिसण्यापूर्वीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे शक्य होत नाही.’ त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ‘काही जिल्हे अंशतः लॉकडाउन, शनिवार व रविवार लॉकडाउन आणि रात्री कर्फ्यू लादत आहेत, परंतु हे पुरेसे नाही आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांनी कंटेनमेंट झोनकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.’ (हेही वाचा: Night Curfew आणि Lockdown सारख्या उपाययोजना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नाहीत; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र)
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात गेलेल्या केंद्रीय पथकाला असे आढळले की, राज्यात सकारात्मक आढळलेल्या लोकांची संख्या मुंबईतील 5.1 टक्क्यांवरून औरंगाबादमध्ये 30 टक्के वाढली आहे, याचा अर्थ अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांच्या चाचणी घेतल्या जात नाहीत आणि त्यामुळेच हा संसर्ग पसरत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापासून कोरोना विषाणूची दैनंदिन प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यात 15 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.