Sam Altman | (Photo Credit: ANI)

Sam Altman Sex Abuse Allegation: ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन (OpenAI CEO Sam Altman) नवीन अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर अत्यंत गंभीर असे लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे हे आरोप त्यांच्याच बहिणीने केले आहेत. सॅम ऑल्टमनच्या बहिणीने फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे आणि तिचा भाऊ ओपनएआयच्या सीईओवर जवळपास एक दशकापासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अहवालानुसार, 30 वर्षीय ॲन ऑल्टमनने आरोप केला आहे की, सॅम ऑल्टमनने 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत मिसूरीमध्ये तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

सोमवारी दाखल केलेल्या दाव्यानुसार, कथित अत्याचाराची सुरुवात ती 3 वर्षांची होती तेव्हा झाली आणि शेवटची घटना कथितपणे घडली जेव्हा सॅम प्रौढ होते, परंतु त्यांची बहीण अल्पवयीन होती. ॲन ऑल्टमनने यापूर्वी सोशल मीडियावर दावा केला होता की सॅम ऑल्टमनने तिच्यावर अत्याचार केले आहेत.

आता सॅम ऑल्टमन यांनी त्यांची बहीण ॲन ऑल्टमनने केलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप नाकारले आहेत. ते म्हणाले, आम्ही ॲनीवर प्रेम करतो आणि तिच्या आरोग्याबद्दल काळजीत आहोत. सॅम यांनी शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असलेल्या कुटुंबातील सदस्याची काळजी घेणे अत्यंत कठीण आहे. सॅम आणि त्यांचे कुटुंबीय म्हणाले की त्यांनी नेहमी ॲनला मदत करण्याचा प्रयत्न केला.

सॅम ऑल्टमनने फेटाळले आरोप-

ते म्हणतात, आम्ही तिची बिले, भाडे भरण्यास मदत केली. तिला रोजगार शोधण्यात मदत केली, तिला वैद्यकीय मदत दिली. त्यानंतरही तिने सतत जास्त पैसे मागितले आणि आता यासाठी नकार दिल्यावर तिने खोटे आरोप केले. कुटुंबाने ॲनचे आरोप दुःखद आणि पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले. सॅमच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी ॲनच्या आरोपांना जाहीरपणे उत्तर देणे आतापर्यंत टाळले होते, परंतु आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्याने तसे करणे आवश्यक झाले आहे.

खटल्यात, ॲनने असाही दावा केला की या घटनांमुळे तिला तीव्र मानसिक त्रास आणि नैराश्याने ग्रासले आहे. कायदेशीर प्रक्रियेत सत्य समोर आणण्यास तयार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मिसूरी राज्य कायद्यानुसार, एखादी व्यक्ती 31 वर्षापर्यंत बालपणातील लैंगिक शोषणासाठी दावा दाखल करू शकते. ॲन ऑल्टमन नुकसान भरपाईसाठी दावा करत आहे. तिने म्हटले आहे की, तिला गंभीर भावनिक त्रास सहन करावा लागला आहे आणि तिच्या मानसिक आरोग्य उपचारांशी संबंधित वैद्यकीय बिले वाढली आहेत. ब्लूमबर्ग न्यूजने गेल्या वर्षी सॅम ऑल्टमनच्या वैयक्तिक संपत्तीचा अंदाज $2 अब्ज (रु. 17167 कोटी) पेक्षा जास्त असल्याचा व्यक्त केला होता. यामध्ये व्हीसी फंड आणि स्टार्टअप गुंतवणूक यांचा समावेश आहे.