Photo Credit- X

Tech Layoffs 2025: जगप्रसिद्ध ॲपल (Apple Layoffs) कंपनीने आपल्या 185 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांनी चॅरीटी क्लॉजचा गैरवापर करत पगारात फसवणूक केल्याचा या कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनीने कारवाई करुन डच्चू दिलेल्यांमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. सेवाभावी संस्थांना देणगी दिल्याने मिळणाऱ्या आर्थिक सवलतींचा लभ मिळविण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी कथीतरित्या कंपनी नियमांचा चुकाचा वापर केला. या सर्व बाबी कंपनी व्यवस्थापनाला अंधारात ठेऊन करण्यात आल्या. ही बाब कॅलिफॉर्निया येथे असलेल्या क्युपर्टिनो येथील कंपनी मुख्यालयाच्या लक्षात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ॲपल मुख्यालयातून कारवाई

लेटेस्टली मराठीची इंग्रजी भाषेतील सहकारी वेबसाईटने फर्स्टपोस्टच्या हवाल्यने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 185 कर्मचाऱ्यांना वेतन फसवणूक प्रकरणात बडतर्फ करण्यात आले आहे. आपल्या व्यक्तिगत आर्थिक फायद्यासाठी कंपनी नियमांचा चुकीचा वापर करत असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनी मुख्यालयातून या कर्मचाऱ्यांबाबत अतिशय कडक धोरण अवलंबण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नोकरीवरुन काढून टाकलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सहा जणांची ओळख कंपनी व्यवस्थापनाने पटवली असून ते आखाती देशातील असल्याचे पुढे आले आहे. या सर्वांविरोधात पोलीस तक्रार करुन त्यांना अटक केली जाण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे अद्याप तरी पुढे आले नाही.

भारतीय कर्मचाऱ्यांवरही कारवाई

दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, कंपनीने केलेल्या कारवाईमध्ये काही अशा भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांनी तेलुगु सेवाभावी संस्थांना हाताशी धरुन फसवणुकीसदृश्य कृती केल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. आवश्यक चौकशीनंतर या सर्वांवर आणखी कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय असे की, या सर्व प्रकाराबाबत ॲपल कंपनीने अद्यापपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचे अधिकृत माहिती अथवा निवेदन सादर केले नाही. मात्र, प्रसारमाध्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात या कारवाईबाबत ठोस वृत्त दिले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, ॲपलच्या लॉस एंजेलिसमधील जिल्हा मुखत्यार कार्यालयाने त्याच्या मॅचिंग ग्रँट्स प्रोग्रामच्या गैरवापरामुळे त्याच्या बे एरिया कार्यालयातून अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

नेमका घोटाळा काय आहे?

कर्मचाऱ्यांवर आरोप आहे की, त्यांनी कंपनीच्या चॅरीटी नियमांचे उल्लंघन केले. जे करताना त्यांनी कंपनीला सादर केलेल्या तपशीलांमध्ये आपण सेवाभावी संस्थांना देणगी दिल्याचे अधिकृतरित्या दाखवले खरे. पण, या कर्मचाऱ्यांनी या संस्थांशी संगनमत करुन या गोष्टी घडवून आणल्या. ज्यामध्ये कंपनीस देणगीबाबत माहिती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या संस्थांनी सदर कर्मचाऱ्यांना देणगी रुपात दिलेले मूळ पैसे परत केले. कंपनीने कर्मचाऱ्यावर आतापर्यंत केवळ कामावरुन काढून टाकण्याची प्रक्रिया राबवली आहे. मात्र, चौकशीमध्ये जर तथ्य आढळले तर कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ज्यामध्ये त्यांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.