कोरोना साथीच्या (Coronavirus) आजारामुळे जगभरातील देशांमध्ये मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. याकाळात बर्याच लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत. मात्र अनलॉकनंतर देशांची आर्थिक परिस्थिती रुळावर येत आहे. यावर्षी भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांच्या सरासरी पगारामध्ये 7.7 टक्के वाढ करतील (Salary Hike). मात्र, उत्कृष्ट कामगिरी करणार्या कर्मचार्यांचे पगार 60 टक्क्यांपर्यंतही वाढू शकतात. ऑन (Aon) नावाच्या कंपनीने पगाराच्या वाढीसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे. हा सर्वेक्षण अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, जपान, अमेरिका, चीन, सिंगापूर, जर्मनी आणि यूके या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांच्या पगारामध्ये अधिक वाढ करतील.
या देशांमधील कर्मचार्यांच्या सरासरी पगारात 3.1 ते 5.5 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामानाने भारतामध्ये जास्त पगारवाढ होणार आहे. 2020 मध्ये भारतीय कंपन्यांनी वेतनात सरासरी 6.4 टक्क्यांनी वाढ केली होती. क्षेत्रांनुसार ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना 10.1 टक्के इतकी पगारवाढ मिळेल. त्यापाठोपाठ सरासरी 9.7 टक्के टेक कंपन्या, 8.8 टक्के आयटी कंपन्या आणि करमणूक व गेमिंग कंपन्यांमध्ये 8.1 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. यावर्षी रसायन आणि फार्मा कंपन्या आपल्या कर्मचार्यांना 8 टक्के दराने पगार वाढ देऊ शकतील.
या सर्वेक्षणासाठी सुमारे 1200 कॉर्पोरेट हाउसेसमधून डेटा गोळा करण्यात आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, व्यावसायिक सेवांच्या क्षेत्रात वेतन 7.9 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. तर, वित्तीय संस्था यावर्षी आपल्या कर्मचार्यांच्या पगारामध्ये 6.5 टक्क्यांनी वाढ करू शकतात. मात्र, असेही काही क्षेत्र आहेत ज्यांना कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला आहे. या क्षेत्रांमध्ये सरासरी पगार 5.5 ते 5.8 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. या क्षेत्रांमध्ये Retail, Hospitality and Real Estate यांचा समावेश आहे. (हेही वाचा: देशात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा जास्त आजारी व्यक्तींना दिली जाणार कोरोना लस)
दरम्यान, या सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की यंदा 93.5 टक्के संस्थांना सकारात्मक व्यवसायाची अपेक्षा आहे आणि ते आपल्या कर्मचार्यांचे पगार वाढवण्याच्या स्थितीत असतील. मात्र इतर 6.5 टक्के संस्थांचा असा अंदाज आहे की यंदाही त्यांचा व्यवसाय चांगला कामगिरी करू शकणार नाही आणि कर्मचार्यांच्या सरासरी पगारामध्ये वाढ करुन त्यांना टिकवून ठेवणे हे आव्हान असेल.