Representative Image

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर (Most Unsafe City for Women) ठरले आहे. येथे दररोज तीन महिलांवर अत्याचार होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 3 डिसेंबर रोजी जारी केलेल्या वर्ष 2022 च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 2022 मध्ये एका दिवसात येथे बलात्काराचे तीन गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अहवालात असे दिसून आले आहे की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 2022 मध्ये 19 महानगरांमध्ये अशा घटनांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 12.3 टक्के वाढ झाली आहे.

ब्युरोच्या अहवालानुसार, 19 महानगरे (20 लाखांहून अधिक लोकसंख्या  असलेली शहरे- अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, गाझियाबाद, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, कोझिकोड, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे आणि सुरत) मध्ये 2022 मध्ये एकूण 48,755 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली, 2021 (43,414 प्रकरणे) च्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी वाढ झाली. दिल्लीत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची 14,158 प्रकरणे नोंदवण्यात आली असून आरोपपत्राचा दर 72.4 टक्के आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर, मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नागपूर हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून उदयास आले आहे. आकडेवारीनुसार, मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नागपुरात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या कमी आहे. 2022 मध्ये नागपूरमध्ये 115 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली होती, तर पुण्यात 305 प्रकरणे नोंदली गेली होती. आर्थिक राजधानी मुंबईत 80.6 टक्के आरोपपत्र दरासह 6176 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर बेंगळुरूमध्ये 74.2 टक्के आरोपपत्र दरासह 3924 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. (हेही वाचा: UP Minor Girl Rape: 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार,फरार आरोपीचा पाठलाग करत गोळीबार; युपी हादरलं)

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, एनसीआरबीच्या वार्षिक अहवाल आकडेवारीनुसार, 2022 मध्ये एकूण 4,45,256 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, जी 2021 च्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढ दर्शवते (4,28,278 प्रकरणे).