रॉबर्ट वढेरा यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
robart Wadhera (Photo Credit- Twitter/ ANI )

पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी  प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने रॉबर्ट वढेरा आणि त्यांचे निकटवर्तीय मनोज अरोरा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

२००५ ते २०१० या पाच वर्षांत वढेरा यांनी लंडनमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. या मालमत्ता खरेदी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी सुरु आहे. या प्रकरणी वढेरा यांचे सहकारी मनोज अरोरा यांच्या चौकशीत लाचखोरी आणि मालमत्ता खरेदी उघड झाल्याचे सक्तवसुली संचालनालयाचे म्हणणे होते. या प्रकरणी चार महिन्यांपूर्वी दिल्ली, बंगळुरू येथील काही ठिकाणांवर तसेच वढेरा यांच्या दिल्लीतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते

या प्रकरणात रॉबर्ट वढेरा आणि मनोज अरोरा यांच्यावतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.  न्यायालयाच्या या निर्णयामुळे ईडीला हादरा बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर वढेरा यांनी समाधान व्यक्त केले आहे.