राजधानी दिल्लीत (Delhi) मसाज पार्लरची (Massage Centres) कमतरता नाही. बऱ्याचदा पुरुष आपल्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी मुद्दाम अशा मसाज पार्लरची निवड करण्यास प्राधान्य देतात, जिथे महिलांद्वारे मालिश केली जाते. मात्र दिल्ली सरकारने आता अशा मसाज पार्लरवर लगाम घालून क्रॉस-जेन्डर मालिशवर बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की, आता महिलांना पुरुषांच्या पार्लरमध्ये मालिश करता येणार नाही, किंवा महिला या पुरुष कर्मचाऱ्याकडून मालिश करून घेऊ शकणार नाहीत. दिल्ली महिला आयोगाच्या अहवालावर, आम आदमी पार्टी सरकारने सेक्स रॅकेट थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय राजधानीत असलेल्या सर्व मसाज पार्लरमधील निर्बंध कडक करीत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्लीत क्रॉस-जेंडर मसाजवर बंदी घातली आहे. यामुळे शहरातील सेक्स रॅकेट कमी होतील असा त्यांचा विश्वास आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी राजधानीत स्पा आणि मसाज केंद्र चालवण्यासाठी नवीन कडक मार्गदर्शक तत्त्वे मंजूर केली आहेत. यात भिन्न लिंगाच्या व्यक्तीकडून मसाज करून घेण्यास बंदी घालण्याची तरतूद देखील समाविष्ट आहे.
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, पुरुषांच्या मसाजसाठी पुरुषच कर्मचारी असतील तर महिलांच्या मसाजसाठी महिलाच कर्मचारी असतील. स्पा आणि मसाज केंद्रांना नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्यांना त्यांच्या आवारात कोणत्याही लैंगिक क्रिया आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांच्या कामावर ठेवण्यास पूर्णपणे प्रतिबंधित करावा लागेल. (हेही वाचा: Covishield Vaccine: पुन्हा एकदा बदलू शकते 'कोव्हिशील्ड' लसीच्या दोन डोसमधील अंतर; 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी घेतला जाऊ शकतो निर्णय- NK Arora)
दिल्लीत सरकारने घेतलेला हा निर्णय सामाजिक स्तरावर स्तुत्य असल्याचे दिसत आहे. सरकारच्या या नवीन नियमाचे लोकांकडून कौतुक केले जात आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही दिल्लीतील अनेक मसाज पार्लरमध्ये अचानक धाडी घालून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आणि सरकारला शिफारशी सादर केल्या आहेत. आता दिल्लीत भिन्न लिंगाच्या व्यक्तीच्या मालिशवर बंदी घातल्याबद्दल मी दिल्ली सरकारची आभारी आहे.'