शेतकरी चळवळीबाबत (Farmers Protest) सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या ‘टूलकिट’चा (Toolkit) मुद्दा जोर धरत आहे. आता दिल्ली पोलिस गूगलला त्या आयपी एड्रेस आणि लोकेशनची माहिती विचारणार आहेत, जिथून हे टूलकिट प्रथम गुगल डॉक्सवर अपलोड केले गेले होते. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली आहे. आयपी एड्रेस आणि लोकेशनद्वारे ज्याने हे टूलकिट तयार करून ते गुगल डॉक्सवर अपलोड केले त्या व्यक्तीस शोधण्यात मदत होईल. हे टूलकिट ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) ट्वीटरवर शेअर केले होते. आता या टूलकिटच्या लेखकाविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सीपी क्राईम प्रवीर रंजन यांनी 26 जानेवारी रोजी झालेला हिंसाचार हा ‘नियोजित कट’ असल्याचे सांगितले. आता ग्रेटाला हे टूलकिट नक्की कुठून मिळाले याचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हे टूलकिट खलिस्तान समर्थक संघटनेने ग्रेटा थेनबर्गला दिले आहे आणि तेच थनबर्गला वित्तपुरवठा करीत आहेत. प्राथमिक तपासणीत हे टूलकिट कॅनडामधील खलिस्तानी समर्थक संघटनेने तयार केल्याचे माध्यमांनी सांगितले आहे.
Delhi Police are going to write to Google to get the IP address or the location from where the doc was made and uploaded on social media platform. This is being done to identify the authors of the toolkit which was shared on the Google Doc: Police sources
— ANI (@ANI) February 5, 2021
या टूलकिटचा हेतू भारताची प्रतिमा डागाळणे हा होता. ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेले हे टूलकिट 'पीस फॉर जस्टीस' च्या वतीने तयार केले गेले होते. ही संस्था कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये आहे. या पॉवरपॉईंट सादरीकरणात भारताविरूद्ध लक्ष्यित कारवाईची यादी सविस्तरपणे लिहिलेली होती. केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी फेसबुक पोस्टमध्ये दावा केला आहे की, ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटवरून भारताविरूद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर कट रचला गेला असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केलेल्या परदेशी सेलेब्जना अमित शाह यांचे उत्तर- 'कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्याला अडथळा आणू शकत नाही')
दरम्यान, टूलकिट असे दस्तऐवज आहे ज्यात एखाद्या मुद्द्याचा सविस्तर अहवाल देण्यासाठी आणि त्यासंबंधित पावले उचलण्यासाठी सूचना असतात. सामान्यत: एखाद्या मोठ्या मोहिमेत किंवा चळवळीत भाग घेणार्या स्वयंसेवकांना त्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात. ग्रेटाने शेअर केलेल्या टूलकीटमध्ये, सध्या सुरू असलेल्या शेतकरी चळवळीविषयी आवश्यक अपडेट्स कसे मिळवायचे? जर कोणाला शेतकरी चळवळीवर ट्विट करायचे असेल तर त्याने कोणता हॅशटॅग वापरावा? जर काही समस्या असेल तर कोणाशी बोलावे? ट्विट करताना काय करणे महत्वाचे आहे? काय टाळावे? या सर्व गोष्टी आहेत.