Real Estate Prices in India: देशात 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत मुंबई, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरूसह 43 शहरांमधील रिअल इस्टेटच्या किंमतीमध्ये वाढ- NHB Data
Housing Society | प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत देशातील 50 पैकी 43 शहरांमध्ये मालमत्तेच्या किमतीत (Real Estate Prices) वाढ झाली आहे. मात्र, 7 शहरांमध्ये मालमत्तांच्या किमतीत घट झाली आहे. गृहकर्जाचे दर अद्यापही प्री-कोविड कालावधीच्या तुलनेत कमी आहेत, ज्यामुळे एकंदरीत घरे परवडण्याच्या स्थितीत आहेत, असे त्यात म्हटले आहे.

नॅशनल हाऊसिंग बँकेने सांगितले की, भारतातील आठ प्रमुख पहिल्या निवासी बाजारपेठांमध्ये जानेवारी-मार्च 2023 या कालावधीत मालमत्तेच्या किमती वाढल्या आहेत. एचपीआय (Housing Price Index) नुसार, अहमदाबादमध्ये 10.8 टक्के, बेंगळुरू- 9.4 टक्के, चेन्नई- 6.8 टक्के, दिल्ली- 1.7 टक्के, हैदराबाद- 7.9 टक्के, कोलकाता- 11 टक्के, मुंबई- 3.1 टक्के आणि पुण्यात 8.2 टक्के वाढ नोंदवली. (हेही वाचा: मुंबई ठरले स्थलांतरीत लोकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; वर्षभरात घरभाड्यात झाली 15-20 टक्के वाढ)

बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांकडून गोळा केलेल्या मालमत्तेच्या मूल्यांकनावर आधारित, 50 शहरांच्या एचपीआयमध्ये एका वर्षापूर्वी 5.3 टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्षे 2023 च्या चौथ्या तिमाहीत 5.8 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. एचपीआयमधील वार्षिक बदल म्हणजेच घरांची मूल्यांकन किंमत ही सर्व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलत राहते. ज्यात गांधीनगरमध्ये 19.6 टक्क्यांच्या वाढीपासून ते लुधियानामध्ये 12.9 टक्क्यांच्या घसरणीपर्यंत बदल पाहिले गेले आहेत.

तिमाही आधारावर, 50-शहर निर्देशांकाने जानेवारी-मार्च 2023 मध्ये 1.3 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदवली आहे, जी मागील तिमाहीत 1.5 टक्‍के होती. जून 2021 पासून तिमाही आधारावर निर्देशांकात वाढता कल दिसून येत आहे. पुरवठ्याच्या बाजूने, त्यात म्हटले आहे की, बांधकामाधीन आणि न विकल्या गेलेल्या मालमत्तेसाठी उद्धृत केलेल्या किंमतींवर आधारित 50 शहरांतील घरांच्या किंमतीमध्येही मार्च तिमाहीत 11.7 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे, जी एका वर्षापूर्वी 4.8 टक्के होती.