RBI ची Mastercard वर कारवाई; 22 जुलैपासून नवे ग्राहक जोडण्यास बंदी
RBI, Mastrecard (Photo Credits: PTI | Wikimedia Commons)

रिर्झव्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) मास्टरकार्ड (Mastercard) वर नवे ग्राहक जो़डण्यास बंदी घातली आहे. आरबीआय (RBI) च्या निर्देशांचं पालन न केल्याने मास्टरकार्डवर ही कारवाई करण्यात आली आहे. संस्थांना पेमेंट सिस्टम डेटा संग्रहित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पुरेशी मदत देऊनही मास्टरकार्डकडून या नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईमुळे मास्टरकार्ड 22 जुलै पासून नवे ग्राहक जोडू शकणार नाहीत. हे निर्बंध डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड स्थानिक ग्राहक जोडण्यावर लागू असतील.

पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अ‍ॅक्ट, 2007(पीएसएस अॅक्ट)च्या कलम 17 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाचा कोणताही परिणाम सध्याच्या ग्राहकांनावर होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. मास्टरकार्ड सर्व कार्ड जारी करणार्‍या बँकांना आणि बिगर बॅंकांना या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. (PDCC Bank: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जुन्या नोटांमुळे गोत्यात, RBI कडून 22 कोटी 25 लाख रुपयांच्या 'त्या' नोटा स्वीकारण्यास नकार)

मास्टरकार्ड हे एक पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहे. हे पीएसएस कायद्यांतर्गत देशात कार्ड नेटवर्क ऑपरेट करण्यासाठी अधिकृत आहे. पेमेंट सिस्टमद्वारे हाताळला जाणारा ग्राहकांचा डेटा हा फक्त भारतातीलच सिस्टमध्ये स्टोअर केला जावा, यासाठी आरबीआयकडून 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, असे 6 एप्रिल 2018 रोजीच्या आरबीआयच्या परिपत्रकात म्हटले आहे.

यामध्ये इंड-टू-इंड ट्रान्जॅक्शन डिटेल्स, गोळा केलेली माहिती, प्रोसेस केलेली माहिती, पेमेंट इन्स्ट्रक्शन्स अशा प्रकारच्या युजर डेटाचा समावेश आहे. यासोबतच सर्व पेमेंट सिस्टमने बोर्डाने मान्यता दिलेले सिस्टम ऑडिट रिपोर्ट आरबीआयकडे सुपूर्त करणे गरजेचे आहे.