
गुजरातमधील वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर अली आहे. राजकोट (Rajkot) जिल्ह्यातील जसदान शहरात 76 वर्षीय राम बोरीचा यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा प्रताप (52) यांची गोळ्या घालून हत्या केली. राम बोरीचाची पुनर्विवाह करण्याची इच्छा होती, ज्याला त्याचे कुटुंब सतत विरोध करत होते. याच रागातून त्याने आपल्या मुलाची हत्या केली. रविवारी बोरीचाने प्रतापवर दोन गोळ्या झाडल्या. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा बोरिचा त्यांच्या मुलाच्या निर्जीव मृतदेहाजवळ खुर्चीवर शांतपणे बसलेला आढळला. जसदान पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी तपन जानी यांनी सांगितले की, मृताची पत्नी जया हिने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या सासरच्यांना पत्नीच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी पुन्हा लग्न करायचे होते, परंतु कुटुंबाला ते मान्य नव्हते.
घटनेच्या वेळी जया घरीच होत्या. जेव्हा त्या त्यांच्या सासऱ्यांना चहा देण्यासाठी गेल्या तेव्हा अचानक घरातून गोळीबाराचा आवाज आणि त्यांच्या पतीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्या घाबरून खोलीकडे गेल्या, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. काही क्षणांनंतर, दुसऱ्या गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर दार उघडताच बोरीचाने पिस्तूल दाखवत त्यांचा पाठलाग केला, पण त्या पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यानंतर प्रतापला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत जया म्हणाल्या की, त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि शस्त्र दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी हत्येत वापरलेली बंदूक जप्त केली आहे आणि ती परवानाकृत होती की नाही याचा तपास करत आहेत. चौकशीदरम्यान, बोरीचाने स्पष्टपणे सांगितले की त्याला त्याच्या मुलाला मारल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसतो की, त्यांनी मला खूप त्रास दिला. पोलिसांनी सांगितले की, राम बोरीचा पूर्वी गुजरात राज्य रस्ते वाहतूक महामंडळात (GSRTC) नोकरी करत होता. तर, मृत मुलगा प्रताप शेती करत होता.