Rahul Gandhi and Swami Avimukteshwaranand Saraswati

उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून ‘बहिष्कृत’ केल्याची घोषणा केली. ही घोषणा बद्रीनाथ येथील शंकराचार्य आश्रमात झाली, जिथे त्यांनी राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीवर केलेल्या वक्तव्याला सनातन धर्माचा अपमान ठरवले. शंकराचार्यांनी सांगितले की, गांधी यांना तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. या निर्णयामुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.

राहुल गांधी यांनी डिसेंबर 2024 मध्ये लोकसभेत हाथरस बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करताना मनुस्मृतीवर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘बलात्कार्‍यांना संरक्षण देण्याचे सूत्र राज्यघटनेत नाही, तर तुमच्या पुस्तकात, म्हणजेच मनुस्मृतीत आहे. उत्तर प्रदेशात तुम्ही राज्यघटनेनुसार नव्हे, तर मनुस्मृतीनुसार शासन करता.’ गांधी यांनी यूपीतील पीडितेच्या कुटुंबाला भेटल्याचे सांगितले, जिथे त्यांना कळले की बलात्कार्‍यांना मोकाट फिरण्याची मुभा आहे, तर पीडित कुटुंब घरात कैद आहे. त्यांनी या परिस्थितीला मनुस्मृतीशी जोडले आणि भारतीय जनता पक्ष मनुस्मृतीला राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ मानतो, असा आरोप केला.

Rahul Gandhi Expels From Hinduism:

आता या वक्तव्यासाठी गांधी यांनी सनातन धर्मावर हल्ला केल्याचा आरोप शंकराचार्यांनी ठेवला. शंकराचार्यांनी आपल्या घोषणेत म्हटले की, ‘मनुस्मृती हा आमचा धर्मग्रंथ आहे. जो व्यक्ती त्याचा अपमान करतो, तो हिंदू असू शकत नाही. ज्याप्रमाणे एखादा मुस्लिम कुराणाचा अपमान करणारा मुस्लिम राहू शकत नाही किंवा ख्रिश्चन बायबलचा अपमान करणारा ख्रिश्चन राहू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुस्मृतीचा अपमान करणारा हिंदू राहू शकत नाही.’ त्यांनी राहुल गांधी यांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्याचे आणि पुजार्‍यांनी त्यांच्यासाठी पूजा न करण्याचे आवाहन केले. याशिवाय, त्यांनी चारधाम यात्रेत केवळ सनातन धर्माचे अनुयायी सहभागी व्हावेत आणि यात्रेला पर्यटनस्थळ बनवू नये, असेही मत व्यक्त केले.

हा निर्णय अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला आहे. शंकराचार्यांनी यापूर्वी 2024 मध्ये राहुल गांधी यांच्या संसदेतील एका भाषणाचे समर्थन केले होते, जिथे गांधी यांनी हिंदू धर्मात हिंसाचाराला स्थान नसल्याचे म्हटले होते. तेव्हा शंकराचार्यांनी गांधी यांचे वक्तव्य हिंदू धर्माविरुद्ध नसल्याचे सांगितले होते. मात्र, मनुस्मृतीवरील टीकेमुळे त्यांनी आपली भूमिका बदलली. शंकराचार्यांनी गांधी यांना तीन महिन्यांपूर्वी पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले होते आणि त्यानंतर स्मरणपत्रही पाठवले, परंतु गांधी यांनी उत्तर न दिल्याने हा कठोर निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती)

मनुस्मृती, ज्याला ‘मनूचे नियम’ असेही म्हणतात, हा एक प्राचीन हिंदू कायदेशास्त्र ग्रंथ आहे, जो धर्म, सामाजिक रचना आणि आचारसंहिता यांचे मार्गदर्शन करतो. हा ग्रंथ आधुनिक काळात वादग्र्फस्त आहे, कारण त्यात जातीभेद आणि लिंगभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या काही तरतुदींचा समावेश आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी 1927 मध्ये मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन करून त्यातील जातीभेदाला विरोध दर्शवला होता. आजही अनेक सामाजिक सुधारक आणि राजकीय नेते मनुस्मृतीला सामाजिक विषमतेला प्रोत्साहन देणारा ग्रंथ मानतात, तर काही धार्मिक गट त्याला सनातन धर्माचा पवित्र भाग मानतात.